मुंबई: युक्रेनवर हल्ला केल्यानं अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियावर आर्थिक आणि व्यापारी निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. अनेक कंपन्यांनी रशियातून काढता पाय घेतल्यानं रशियासमोर महसुली संकट निर्माण झालं आहे. आता यातून मार्ग मागण्यासाठी रशियाला मोठी ऑफर दिली आहे.
रशियन तेल कंपन्या भारताला सवलतीच्या दरात खनिज तेलाचा पुरवठा करण्यास तयार आहेत. सध्याच्या दरापेक्षा २५ ते २७ टक्के सवलत देण्याची तयारी कंपन्यांनी दाखवली आहे. रशियाची सरकारी तेल कंपनी रोसनेफ्थ अनेक आधीपासूनच भारताला तेल पुरवठा करते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी रोसनेफ्थ आणि इंडियन ऑईलमध्ये २० लाख टन तेल पुरवठ्याचा करार झाला होता.
रशियन कंपन्यांनी भारताला सवलतीच्या दरात तेल पुरवठा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. रशियन कंपन्यांनी दिलेला प्रस्ताव आकर्षक आहे. मात्र या कंपन्यांशी व्यवहार कसा करायचा, तो कोणत्या चलनात होणार याबद्दल अद्याप तरी कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.
रशियावर निर्बंध घातलेल्या तारखेच्या आदल्या दिवशी तेलाचे जे दर होते, त्यावर ११.६० डॉलर प्रति बॅरल सूट देण्याची तयारी कंपन्यांनी दर्शवली आहे. मात्र अमेरिका आणि युरोपियन देशांच्या निर्बंधांच्या भीतीनं कोणीही सवलतीच्या दरांत खरेदी केलेली नाही. भारतीय कंपन्यांनी कारवाईच्या भीतीनं रशियात पैसे पाठवणं बंद केलं आहे. अमेरिका आणि युरोपियन महासंघानं रशियाच्या अनेक बँकांना स्विफ्टमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.