मॉस्को: युक्रेनविरुद्ध रशियानं युद्धाची घोषणा करून जवळपास दोन आठवडे पूर्ण होत आले आहेत. मात्र अद्यापही युद्ध थांबण्याची चिन्हं नाहीत. बलाढ्य रशियन फौजेसमोर युक्रेन आठवड्याभरात शरणागती पत्करेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र अमेरिका आणि युरोपियन देशांकडून मिळालेल्या लष्करी सामग्रीच्या बळावर युक्रेननं रशियन सैन्याचं मोठं नुकसान केलं आहे. यामुळे आता भारताची चिंता वाढली आहे.
युक्रेननं रशियाचे अनेक रणगाडे, लढाऊ विमानं उद्ध्वस्त केली. अमेरिकेच्या जेनलिन क्षेपणास्त्रांनी रशियाच्या रणगाड्यांची शिकार केली. तर स्टिंगर क्षेपणास्त्रांनी रशियाची लढाऊ विमानं जमीनदोस्त केली. याचा मोठा फटका आता रशियातील संरक्षण सामग्री क्षेत्रातल्या कंपन्यांना बसण्याची शक्यता आहे. रशियन शस्त्रास्त्रांची युक्रेन युद्धात झालेली परिस्थिती पाहता भारताची चिंता वाढणार आहे.
पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत रशियात तयार होणारी शस्त्रं स्वस्त असतात. युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वी रशियाकडे शस्त्रास्त्रांच्या ५५ अब्ज डॉलरच्या ऑर्डर होत्या. मात्र आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. रशियाचे रणगाडे, लढाऊ विमानं सहज उद्ध्वस्त केली जाऊ शकतात, असा संदेश युक्रेन युद्धामुळे गेला आहे. त्यामुळे रशियाकडून होणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या खरेदीत घट होऊ शकते.
तुर्कस्तानमध्ये तयार झालेली बायरकतार ड्रोन विमानं युक्रेनमध्ये रशियाच्या BUK क्षेपणास्त्र यंत्रणेला उद्ध्वस्त करत आहेत. इतकंच नव्हे, अमेरिकेची जॅवलिन आणि ब्रिटनची NLAW क्षेपणास्त्रं रशियाच्या अत्याधुनिक टी-७२ रणगाड्यांना सहज लक्ष्य करत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. भारतीय लष्कराकडे २ हजार टी-७२ रणगाडे आहेत.
अमेरिका आणि ब्रिटनकडे असलेल्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांच्या दर्जाची Arena-M सुरक्षा यंत्रणा तयार केल्याचा रशियाचा दावा होता. मात्र हा दावा युक्रेनमध्ये फोल ठरला. रशियाकडून रणगाडे विकत घेणाऱ्या देशांची संख्या मोठी आहे. मात्र युक्रेनमध्ये रशियन रणगाड्यांची झालेली अवस्था पाहता रशियाकडून रणगाडे घेणाऱ्या देशांनी पुनर्विचार सुरू केला आहे. भारत मोठ्या प्रमाणात रशियाकडून शस्त्रास्त्रांची आयात करतो. त्यामुळे भारताचीही चिंता वाढली आहे.