उत्तर प्रदेश : 'सात समंदर पार मै तेरे पिछे पिछे आ गयी' हे लोकप्रिय गाणं तुम्ही अनेकदा ऐकलं असेलच. या गाण्याचे बोल एका तरुणीच्या बाबतील प्रत्यक्षात उतरले आहेत. कारण ही तरुणी सात समुद्र पार करुन यूपीतील बागपतमध्ये आपल्या प्रियकराजवळ आली आहे. ती तिच्या प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी थेट युक्रेनहून यूपीत आली आहे. पण लग्नाला उशीर होत असल्याने तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट केलं आहे.
बागपतमधील एका तरुणासोबत लग्न करण्यासाठी भारतात आलेली यूक्रेनची veronika khlibova ने पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट करुन सांगितले की, प्रशासन तिच्या लग्नाचं रजिस्ट्रेशन करत नाहीये. त्यामुळे तिने मदतीची मागणी केली आहे.
खेकडा पोलीस स्टेशन क्षेत्रात येणाऱ्या सुभानपुर गावातील अक्षत त्यागी आणि यूक्रेनची वेरोनिकाने एडीएम बागपत कोर्टात स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार अर्ज केला आहे. वेरोनिकाने सांगितले की, तिने सर्व कागदपत्रे तयार केली आहेत. दूतावासाकडूनही सगळी चौकशी पूर्ण झाली आहे. पण प्रशासन अजूनही मॅरेज सर्टिफिकेट जारी करत नाहीये.
वेरोनिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे हैराण झाली आहे आणि त्यांच्यामुळे दोघांचं लग्न रखडलं आहे. त्यामुळे तिने थेट पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांना ट्विट करुन मदत मागितली आहे.
सुभानपुरचा अक्षत त्यागी रशियामध्ये रशियन भाषा शिकण्यासाठी गेला होता. तिथे त्यांची भेट टूरिस्ट स्टुडंट यूक्रेनची वेरोनिकासोबत झाली. दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. वेरोनिका याआधीही अनेकदा अक्षतच्या घरी आली आहे आणि वेगवेगळ्या इव्हेंट्समध्येही ती सहभागी झाली आहे.
याआधीही सुषमा स्वराज यांना अनेकांनी ट्विट करुन मदत मागितली आहे आणि त्यांनी मदतही केली आहे. त्यामुळे आता वेरोनिकाची मदत कधी आणि कशी होते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.