Ukraine PM News: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अद्यापही सुरू आहे. कोणताही देश माघार घेण्यास तयार नाही. यातच युक्रेनचे पंतप्रधान डेनिस शमीहाल यांनी भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वशांतीसाठी काम करत आहेत, असे कौतुकोद्गार शमीहाल यांनी काढले.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना डेनिस शमीहाल म्हणाले की, भारत ज्या वेगाने प्रगती करत आहे, त्याबद्दल आम्ही कौतुक करू इच्छितो. लोकशाही आणि विविधतेतील एकता या मूल्यांची केलेली जपणूक हीच खरी भारताची व्याख्या आहे. भारत हा सर्वांत मोठा लोकशाही देश आहे. मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये त्याचा समावेश होतो, असे शमीहाल यांनी नमूद केले. पूर्वीप्रमाणे विद्यार्थ्यांना युक्रेनमध्ये परत पाठवण्याचे आवाहन आम्ही भारताला करू इच्छितो, असे शमीहाल यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी विश्वशांतीसाठी काम करत आहेत
युक्रेनला मदत केल्याबद्दल आणि मानवीय आधार दिल्याबद्दल डेनिस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. डेनिस म्हणाले की, पंतप्रधान मोदींकडे जागतिक शांततेसाठी काम करणाऱ्या व्यक्ती म्हणून पाहिले जात आहे. पीएम मोदी जी-२० देशांचे मोठे नेते म्हणूनही ओळखले जातात. तसेच युक्रेन सध्या कठीण काळातून जात आहे. रशियाशी युद्ध सुरू आहे. आम्हाला आमच्या मित्र देशांकडून सतत मदत मिळत आहे. मग ती शस्त्रे असो वा मानवतावादी मदत. पण दुर्दैवाने गरज इतकी मोठी आहे की हे सगळे कमीच जाणवत आहे. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त मदत आणि पाठबळ देण्याचे आवाहन डेनिस यांनी केले.
दरम्यान, युक्रेनची भूमिका बदललेली नाही. आजही ते युरोपियन युनियन (EU) आणि NATO चा भाग होण्याची वाट पाहत आहेत. युक्रेन त्याचा एक भाग होण्यासाठी काहीही करण्यास तयार आहे. युक्रेनचा मोठा भाग शांततामय स्थितीत आहे. म्हणजे तिथे परिस्थिती सामान्य आहे. पूर्वीप्रमाणेच विद्यार्थ्यांना युक्रेनमध्ये पाठवण्यासाठी भारताने मदत करावी. यासोबतच व्यवसायही पूर्वीप्रमाणे सुरू केला पाहिजे, जेणेकरून आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्यास मदत होईल, अशी विनंती डेनिस यांनी केली.