Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अद्यापही सुरूच आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ हे युद्ध सुरू असून कोणताही देश माघार घेताना दिसत नाही. यातच आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून, मदत करण्याची विनंती केल्याचे सांगितले जात आहे. युक्रेनच्या उपपरराष्ट्र मंत्री एमिन झापरोवा चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.
एमिल झापरोवा यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचे पंतप्रधान मोदी यांना लिहिलेले पत्र भारताच्या परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्याकडे सुपूर्द केले. या पत्रात, युक्रेनने औषधे आणि वैद्यकीय उपकरणांसह अतिरिक्त मानवीय गोष्टींचा पुरवठा करण्याची विनंती केली आहे. भारताकडून मदतीचे आश्वासन करणारे ट्विट मीनाक्षी लेखी यांनी केले आहे. तत्पूर्वी, युक्रेनचे मंत्री म्हणाले होते की, रशियासोबत सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी किंवा यातून मार्ग काढण्यासाठी भारताने मदत करावी, अशी इच्छा असल्याचे सांगितले होते. युक्रेनमधील पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी भारतीय कंपन्यांसाठी एक संधी असू शकते असा प्रस्तावही युक्रेनच्या मंत्र्यांनी मांडला आहे, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देताना असे सांगण्यात आले आहे.
रशिया युद्धानंतर पहिली युक्रेन नेता भारत दौऱ्यावर
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनचा नेता भारत दौऱ्यावर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. युक्रेनला पाठिंबा देणारा भारत हा खरा विश्वगुरू असल्याचे कौतुकोद्गार एमिल झापरोवा यांनी काढले. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव संजय वर्मा, परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांचीही भेट घेतली. नेत्यांची भेट घेतल्यानंतर झापरोवा यांनी थिंक टँकच्या कार्यक्रमाला संबोधित केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"