युक्रेनची वधू अन् रशियाच्या वराचा भारतीय रिवाजानुसार विवाह; युद्धाच्या अडथळ्यावर केली मात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 08:16 AM2022-08-08T08:16:53+5:302022-08-08T08:17:18+5:30
धर्मशाला येथे झाला सोहळा
नवी दिल्ली : युक्रेन व रशियाचे युद्ध कधी संपणार याबद्दल अनिश्चितता आहे. मात्र, प्रेम युद्ध किंवा अन्य अडथळ्यांवर मात करून यशस्वी होते हे दर्शविणारी एक घटना घडली आहे. रशियाचा वर व युक्रेनची वधू हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे येऊन भारतीय रीतीरिवाजांनुसार विवाहबद्ध झाले.
युद्ध संपण्याची चिन्हे नसल्याने रशियाचा नवरदेव सेर्गेई नोविकोव व युक्रेनची वधू एलोना ब्रामोका यांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी भारतात येऊन विवाह करण्याचे ठरविले. त्या अनोख्या विवाहाबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर झळकल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी या जो़डप्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. विवाहप्रसंगी वधू एलोना ब्रामोका हिने लाल रंगाची साडी, तर सेर्गेई नोविकोव या नवरदेवाने शेरवानी परिधान केली होती.
विवाहप्रसंगी पुरोहित म्हणत असलेल्या मंत्रांचा अर्थ समजून घेण्यासाठी या जोडप्याने एका दुभाष्याची मदत घेतली. धर्मशाला येथील एका मंदिरात हा अनोखा विवाह थाटात पार पडला. सेर्गेई नोविकोव व एलोना ब्रामोका यांची प्रेमकहाणी दोन वर्षांपूर्वी सुरू झाली. त्यावेळी रशिया, युक्रेनचे संबंध विकोपाला गेले नव्हते; पण काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या युद्धामुळे परिस्थिती बिकट झाली. त्यामुळे उद्भवलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी या जोडप्याने भारतात जाऊन विवाह केला. (वृत्तसंस्था)
युक्रेन युद्धभूमीवरही झाले विवाह
युक्रेनमधील एक युवक, युवतीची २०१५ साली युद्ध प्रशिक्षणामध्ये भेट झाली होती. ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर त्यांची युक्रेन युद्धात पुनश्च भेट झाली. युद्ध सुरू असतानाही या जोडप्याने विवाह करण्याचा निर्णय घेतला. किव्हनजीक असलेल्या एका रुग्णालयात यंदाच्या वर्षी हा विवाह सोहळा पार पडला.