ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १८ - जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी उमर खालीद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांना जामिन मंजूर करण्यात आला आहे. दिल्ली न्यायालयाने 6 महिन्याचा हंगामी जामिन मंजूर केला आहे. देशद्रोहाच्या आरोपाखाली दोघांना अटक करण्यात आले होते. 24 फेब्रुवारीला दोघेही दिल्ली पोलिसांना शरण आले होते. न्यायालयाने दोघांनाही न्यायलायाच्या परवानगीशिवाय दिल्ली सोडून न जाण्याचे आदेश दिले आहेत.
9 फेब्रुवारीला जेएनयूमध्ये अफजल गुरुच्या समर्थनार्थ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपाखाली कन्हैय्या कुमारसहित उमर खालीद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांना अटक करण्यात आली होती. कन्हैय्या कुमारला जामीन मिळाला असला तरी उमर खालीद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांना जामीन मिळाला नव्हता.
दरम्यान दिल्ली पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात उमर खालीद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांनीच विद्यार्थ्यांना देशविरोधी घोषणा देण्यासाठी उकसवलं असल्याची माहिती दिली होती. उमर खालीद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांनीच 9 फेब्रुवारीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आयोजकांमध्ये कन्हैय्या कुमारचा समावेश नव्हता अशी माहितीदेखील पोलिसांनी दिली आहे.