नवी दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) विरोधात देशभरात आंदोलने, निषेध करण्यात आले. त्यानंतर दिल्लीत उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल केले. त्यातील एक नाव म्हणजे जेएनयूचा माजी विद्यार्थी आणि नेता उमर खालीद. सीएए विरोधात केलेले आंदोलन धर्मनिरपेक्ष होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी कथा रचून तयार केलेले आरोपपत्र जातीयवादी होते, असा आरोप उमर खालीद (Umar Khalid) याने केला आहे. दिल्ली न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू असताना उमर खालीदच्या वतीने त्रिदीप पैस यांनी न्यायालयात बाजू मांडली.
दिल्ली दंगलीनंतर खालिद आणि इतर अनेक जणांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, युएपीए हा दहशतवादविरोधी कायदा आहे. खालिदसह इतरांवर दंगलीचे मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमिताभ रावत यांच्या न्यायालयासमोर जामीन अर्जावर युक्तिवाद करताना वकील पैस यांनी दिल्ली पोलिसांवर आरोप केला की, आरोपपत्र ही पोलिसांच्या डोक्यातून निघालेली सुपीक कल्पना आहे. यावेळी त्यांनी तपास अधिकाऱ्यांना कादंबरी लिहिणारे लेखक असल्याचा टोला लगावला.
खालिदविरोधात कोणतेच पुरावे नाही
खालिदविरोधात कोणतेच पुरावे नाही, तो दिल्लीत हजर नव्हता, हिंसाचारात त्याचा सहभाग नाही तसेच फंडिंगचा पण त्याच्याशी संबंध नाही. दंगल घडल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला, जबाब नोंदवले, निवेदने तयार केली आणि फक्त सीडीआर लोकेशन सहआरोपींशी जुळले म्हणून त्यांनी खालिदला अटक केली, असा दावा खालीदच्या वकिलांनी न्यायालयात केला. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हे आंदोलन झालं किंवा महिलांचे शोषण झाले आहे, असे एकाही साक्षीदाराने सांगितले नाही. असे अनेक लोक आहेत जे शिक्षित आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात आणि ते CAA शी संबंधित आहेत. परंतु सुदैवाने ते आरोपी नाहीत, असे उमर खालीदचे वकील पैस यांनी न्यायालयाला सांगितले.
दरम्यान, दिल्ली दंगलीत ५३ लोक मारले गेले आणि ७०० हून अधिक जखमी झाले होते. यानंतर पोलिसांनी अनेकांवर दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले.