नवी दिल्ली - दिल्लीच्या उत्तर पूर्व भागात फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या दंगलप्रकरणी जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी विद्यार्थी उमर खालीदचा जामीन अर्ज कडकडडुमा न्यायालयाने फेटाळला आहे. पोलिसांनी युपीपीएअंतर्गत उमर खालीदला अटक केली होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी उमर खालीदला मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल करत अटक केली होती.
उत्तर पूर्व दिल्लीतील दंगलीच्या घटनांमध्ये उमर खालीद प्रमुख आरोपी होता. तो अनेक व्हॉट्सअप ग्रुपचा सदस्य होता, ज्याद्वारे हिंसा घडविण्याचा कट रचण्यात आला होता. उमरनेच हिंसा करण्यासाठी लोकांना भडकावले. विशेष म्हणजे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात आले, तेव्हा लोकांना रस्त्यावर उतरवत विरोध करण्यासही त्यानेच भाग पाडले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे दिल्ली पोलिसांनी फिर्यादीत म्हटले आहे.
दिल्ली दंगलप्रकरणी न्यायालयात आरोपी उमर खालिदच्यावतीने केलेल्या युक्तीवादात, सर्व आरोप हे खोटे आणि मनघडावू असल्याचे सांगण्यात आले होते. कुठल्याही मुद्द्यावर आपला आवाज उठवणे म्हणजे गुन्हा नाही, असे उमरच्या वकिलांनी न्यायालयात म्हटले होते. दरम्यान, फेब्रुवारी 2020 मध्ये उत्तर पूर्व दिल्लीत हिंसाचाराची घटना घडली होती. त्यामध्ये 53 लोकांचा मृत्यू झाला होता, तर अंदाजे 700 लोक जखमी झाले होते.