ऑनलाइन लोकमत
अलीगड, दि. ३१ - क्रिकेट सामन्या दरम्यान पंचांच्या निर्णयावरुन अनेकदा वादविवाद होतात. महत्वाच्याक्षणी पंचांचा एखादा चुकीचा निर्णय संपूर्ण सामन्याचे चित्र बदलून टाकतो. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर क्रिकेट संघटनांच्या कठोर नियमांमुळे खेळाडू एखाद्यावेळी पंचांशी निर्णयावरुन हुज्जत घालतात पण त्यापलीकडे हे वाद वाढत नाहीत. स्थानिक क्रिकेट स्तरावर मात्र असे कुठलेही नियम नसल्यामुळे पंचांच्या निर्णयावरुन होणारे वाद हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचतात.
उत्तरप्रदेशातील अलिगडमधील जारारा गावामध्ये पंचाचा निर्णय न पटल्यामुळे तरुणीला विष पाजून ठार मारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जरारा हे अलीगडपासून वीस कि.मी. अंतरावर असलेले छोटेसे गाव. या गावामध्ये आयपीएलच्या धर्तीवर १४ मे पासून जरारा प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा सुरु झाली होती.
३० मे रोजी अंतिम सामना होता. २७ मे पर्यंत स्पर्धा सुरळीत सुरु होती. २८ मे रोजी जरारा आणि बारीकी संघां दरम्यानच्या सामन्यात पंच राजकुमार यांनी महत्वाच्या क्षणी गोलंदाजाने टाकलेला चेंडू नो बॉल दिला. पंचाचा हा निर्णय संदीप पालला पटला नाही. त्याने निर्णयावरुन पंच राजकुमार यांच्याशी हुज्जत घातली व आपला निर्णय बदलण्यास सांगितले. पण पंच राजकुमार आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
त्यामुळे चिडलेल्या संदीपने पंचाला तुला गंभीर परिणाम भोगावे लागतील, तुझ्या कुटुंबातील एका सदस्याला जीव गमवावा लागेल अशी धमकी दिली. पश्चिम उत्तरप्रदेशात क्रीडा स्पर्धां दरम्यान अशा हिंसाचाराच्या घटना सामान्य समजल्या जातात. २९ मे ला दुस-याचा दिवशी संदीप पालने शेतावर जाणा-या राजकुमारच्या बहिणीला गाठले.
राज कुमारचे कुटुंबिय कुठल्यावेळेला शेतात जातात हे त्याला चांगले ठाऊक होते. राजकुमारची १५ वर्षांची बहिण पूजा आणि तिच्यासोबत असलेल्या तीन मैत्रिणींना संदीप पालने विष मिसळलेले कोल्डड्रीक पाजले. पूजा संदीपला ओळखत असल्यामुळे तिला कुठलाही संशय आला नाही. ती विश्वासाने ते कोल्ड्रींग प्यायली.
पण कोल्ड्रींग प्याल्यानंतर पूजा आणि तिच्या मैत्रिणी तिथेच कोसळल्या. या घटनेत पूजाचा मृत्यू झाला. तिघींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जरारा गावचे प्रधान रतन पाल रावल या घटनेबद्दल बोलताना म्हणाले की, मी सुरुवातीपासून या स्पर्धेला विरोध केला होता. या लोकांना स्पोटर्समनशिप म्हणजे काय ते समजत नाही. स्पर्धा आयोजित करु नये असे माझे सुरुवातीपासून मत होते अखेर माझी भिती खरी ठरली.