नवी दिल्ली - देशातील वाढती लोकसंख्या ही भारतासमोरील सर्वात मोठी समस्या बनत चालली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरिकांना सोयी सुविधा पुरविताना सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या, जगातील क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताचा नंबर लागतो. तर, या यादीत चीन अग्रस्थानावर आहे. मात्र, लवकरच लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकणार असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार पुढील आठ वर्षात भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार आहे. दरम्यानच्या काळात चीनने काही कडक नियम बनवून आणि जनजागृतीद्वारे आपल्या देशाची लोकसंख्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे, आगामी काही वर्षात चीनच्या लोकसंख्येत 31.4 मिलियन्स घट होईल किंवा 2019 ते 2050 या कालावधीत चायनिज लोकसंख्येत 2.2 टक्क्यांची घट होणार आहे. 'द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स 2019' या मथळ्याखाली संयुक्त राष्ट्रांचा एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालानुसार जगातील लोकसंख्येत 2050 पर्यंत अंदाजे 2 बिलियन्स एवढी वाढ सांगण्यात आली आहे. त्यानुसार, सध्या असलेल्या 7.7 बिलियन्स लोकसंख्येत वाढ होऊन जगातील एकूण लोकसंख्या 9.7 बिलियन्स एवढी होईल. त्यामध्ये भारतासह इतर आठ देशांची लोकसंख्या एकत्र केल्यास जगातील लोकसंख्येच्या 50 टक्के लोकसंख्या या 8 देशांची असेल. 2050 पर्यंत ज्या 9 देशांची लोकसंख्या सर्वाधिक वाढेल, त्यामध्ये भारत, नायजेरिया आणि पाकिस्तानच्या लोकसंख्येत सर्वाधिक वाढ होणार आहे.
जागतिक लोकसंख्या दरवाढ लक्षात घेता, जन्मदर कमी झाल्याचे दिसून येते. सन 1990 मध्ये प्रत्येक महिलेचा जन्मदर 3.2 एवढा होता, तो 2050 पर्यंत 2.2 एवढा कमी होईल. जगातील लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी जन्मदर 2.1 पर्यंत कमी होणं गरजेचं आहे.