UN Report : दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट भारतात मोठ्या प्रमाणात हल्ले करण्याच्या तयारीत होते, परंतु मोदी सरकारच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, अशी खळबळजनक माहिती संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून समोर आली आहे.
ISIL (Daesh), अल-कायदा आणि संबंधित व्यक्ती आणि संघटनांवर विश्लेषणात्मक सहाय्य आणि मंजुरी देखरेख गटाच्या 35 व्या अहवालानुसार, हे दहशतवादी गट आणि संबंधित संघटना बाह्य-दहशतवादविरोधी दबावाला प्रतिसाद देण्यासाठी कट रचत आहेत. ISIL (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट) हा एक दहशतवादी गट असून, त्यांचे ध्येय पश्चिम आशियामध्ये "खिलाफत" स्थापित करणे आहे. या दहशतवादी संघटनेला ‘इस्लामिक स्टेट दाएश’ म्हणूनही ओळखले जाते.
UN च्या अहवालात काय आहेUN च्या अहवालात म्हटले आहे की, ISIL (Daesh) भारतात मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्यात अपयशी ठरला. परंतू, त्याच्या हस्तकांनी भारतात आपल्या समर्थकांद्वारे हल्ले करण्याचा प्रयत्न केला. ISIL (Daesh) समर्थित ‘अल-जवाहर’ मीडियाने त्यांच्या प्रकाशन सीरत उल-हकद्वारे भारताविरुद्ध अपप्रचार सुरू ठेवला आहे. या अहवालात असेही म्हटले आहे की, अफगाणिस्तानमध्ये दोन डझनहून अधिक दहशतवादी गट सक्रिय आहेत आणि त्यांच्यामुळे सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
इस्लामिक स्टेट-खोरासान प्रदेशासाठी धोका: गुटेरेससंयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की, अफगाणिस्तानातील स्थिती चिंताजनक आहे. इस्लामिक स्टेट-खोरासान केवळ देशासाठीच नाही, तर या प्रदेशासाठी आणि त्यापलीकडेही धोका आहे. अफगाणिस्तान पुन्हा एकदा इतर देशांना प्रभावित करणाऱ्या दहशतवादी कारवायांचे केंद्र बनण्यापासून रोखण्यासाठी आम्ही सर्व सदस्य राष्ट्रांना एकत्र येण्याचे आवाहन करतो.
अफगाणिस्तान-आधारित अल-कायदाने शेजारील देशांमध्ये आपली उपस्थिती वाढवण्यासाठी तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP), इस्लामिक मूव्हमेंट ऑफ उझबेकिस्तान, इस्टर्न तुर्किस्तान इस्लामिक मूव्हमेंट (ETIM/TIP) आणि जमात अन्सारउल्लाह या गैर-अफगाण वंशाच्या प्रादेशिक दहशतवादी संघटनांशी संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. याचा भारतालाही मोठा धोका असल्याचे रिपोर्टमधून सांगण्यात आले आहे.