अहमदाबाद - एकवेळ तुरुंगात जाईल पण पत्नीला पोटगीची रक्कम देणार नाही, असा पवित्रा एका पतीने घेतला आहे. विशेष म्हणजे, न्यायालयाच्या आदेशानंतर हे महाशय वाजत-गाजत आपल्या मित्रांसमवेत पोलीस ठाण्यात पोहोचले. तसेच पोलिसात जाण्यापूर्वी त्याने आपल्या आई-वडिलांचे पाय धरुन आशीर्वादही घेतला. या नवरोबाचे कृत्य पाहून पोलीसही अवाक झाले. गुजरातच्या वडोदरा येथे ही घटना घडली आहे. या दाम्पत्याने काही महिन्यांपूर्वी घटस्फोट घेतला आहे.
हेमंत राजपूत या 36 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीपासून घटस्फोट मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज केला. याप्रकरणी न्यायालयाने पत्नीला पोटगी देण्याचा आदेश दिला. पत्नीला दरमहा 3500 रुपये पोटगी देण्याचे न्यायालयाने हेमंतला बजावले. मात्र, हेमंतने पत्नीला पैसे न दिल्याने ही रक्कम दरमहिन्याला वाढत जाऊन 95,000 रुपयांपर्यंत पोहोचली. त्यामुळे पत्नीने पुन्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर, न्यायालयाने हेमंतला तात्काळ पैसे देण्याचे बजावले, अन्यथा तुरुंगात पाठविण्यात येईल, अशी समज दिली. त्यावर, मी तुरुंगात जाईल, पण पत्नीला पोटगी देणार नाही, असा निर्णय हेमंतने घेतला.
न्यायालयाच्या आदेशान्वये पोलिसांनी हेमंतला अटक करण्यासाठी त्याचे घर गाठले. पण, हेमंत घरी नसल्यामुळे पोलिसांनी हेमंतला पोलीस ठाण्यातत हजेरी लावण्याचा निरोप ठेवला. त्यानंतर, आपल्या मित्रांसह हेमंतने वाजत-गाजत पोलीस ठाणे गाठले. विशेष म्हणजे 15 वर्षे संसार केल्यानंतर घरगुती वादातून या पती-पत्नीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, पत्नी हेमंतला आपल्या आई-वडिलांपासून वेगळं राहण्यास सांगत होती. पण, पतीला हे मान्य नव्हतं, असे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी न्यायालयाने हेमंतला पोटगी न दिल्यास 270 दिवस तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.