नवी दिल्ली, दि. 10 - देशातील मुस्लिमांमध्ये अस्वस्थतेची जाणीव आणि असुरक्षततेची भावना असल्याचं वक्तव्य देशाचे मावळते राष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केलं आहे. हमीर अन्सारी यांचा उपराष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ गुरुवारी पुर्ण होत आहे. देशात असहिष्णुता आणि स्वयंघोषित गोरक्षकांकडून होणा-या हल्ल्यांच्या घटना समोर येत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. राज्यसभा टीव्हीवर दिलेल्या मुलाखतीत बोलताना केलेल्या या विधानातून त्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर एकाप्रकारे टीकाच केली आहे.
हमीद अन्सारी यांनी सांगितलं आहे की, 'असहिष्णुतेचा मुद्दा मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील सहका-यांसमोर उपस्थित केला आहे'. देशातील नागरिकांच्या राष्ट्रीयत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणं अत्यंत विचलित करणारं असल्याचंही ते बोलले आहेत. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपला कार्यकाळ संपत असतानाच असं वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
आपल्याला वाटत असलेली चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलून दाखवली का असं विचारलं असता हमीद अन्सारी यांनी होकार दिला. हमीद अन्सारी पुढे बोलले की, तथाकथित गोरक्षकांचे हिंसक हल्ले, कथित घरवापसी, राष्ट्रवादाचा अतिरेकी, अंधश्रद्धेचा विरोध करणाऱ्यांची हत्या या घटना भारतीय मूल्यांना, संस्कृतीला मारक ठरत आहेत. आपल्याच नागरिकांसाठी कायदा आणि सुव्यवस्था लागू करण्याची सरकारी अधिकाऱ्यांची क्षमताही वेगवेगळ्या स्तरावर कमी पडत आहे.
'देशाच्या मुस्लीम समाजामध्ये आज असुरक्षितता आणि भीतीची भावना आहे. देशाच्या विविध भागांमधून मला अशा अनेक घटना ऐकायला मिळाल्या आहेत. भारतीय समाज वर्षानुवर्ष विविधतावादी आहे. पण आता हे वातावरण धोक्यात आहे. नागरिकांच्या भारतीयत्वावर प्रश्न उपस्थित करण्याची प्रवृती अतिशय चिंताजनक आहे', असं अन्सारी बोलले आहेत.
देशातील मुस्लिमांच्या मनात शंकेचं वातावरण आहे, आणि ज्या प्रकारची वक्तव्यं त्यांच्याविरोधात येत आहेत त्यामुळे त्यांच्यात असुरक्षततेची भावना जागी होत आहे का ? असा प्रश्न विचारला असता हमीद अन्सारी यांनी सांगितलं की, 'देशातील वेगवेगळ्या भागांमधून जे ऐकायला मिळत आहे त्यावरुन तुमचा अंदाज योग्य आहे. मी बंगळुरुत ही गोष्ट ऐकली होती. देशातील अन्य भागांमध्येही ऐकलं आहे. उत्तर भारतात या गोष्टी जास्त प्रमाणात ऐकायला मिळतात. अस्वस्थतेची जाणीव आणि असुरक्षिततेची भावना मनात घर करत आहे'.