छत्तीसगडमध्ये काका विरुद्ध पुतण्याची लढत! भूपेश बघेल यांच्या विरोधात विजय बघेल यांना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 07:16 PM2023-08-17T19:16:42+5:302023-08-17T19:17:47+5:30
भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीनंतर ही यादी जाहीर करण्यात आली आहे.
नवी दिल्ली: मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. छत्तीसगडमध्ये २१ आणि मध्य प्रदेशातील ३९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सध्या छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे आणि मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीनंतर ही यादी जाहीर करण्यात आली आहे.
छत्तीसगडसाठी जाहीर केलेल्या यादीतील सर्वात लोकप्रिय जागा दुर्ग जिल्ह्यातील पाटण आहे. कारण, भाजपाने येथून विजय बघेल यांना उमेदवारी दिली आहे. पाटण ही ओबीसीबहुल जागा राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा बालेकिल्ला आहे. विजय बघेल हा भूपेश बघेल यांचा पुतण्या आहे. त्यामुळे या जागेवरील निवडणूक रंजक बनली असून काका-पुतण्यांमध्ये निवडणूक लढत पाहायला मिळणार आहे.
विजय बघेल सध्या भाजपाचे खासदार आहेत. पाटण विधानसभा हा नेहमीच जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला आहे. यामुळेच येथील मतदारांनी सदैव विवेकबुद्धीने मतदान केले असून प्रत्येक वेळी निकालात उलटे दिसले आहेत.
काका-पुतणे चौथ्यांदा आमनेसामने-
गेल्या वेळी या जागेवरून भूपेश बघेल यांच्यासमोर भाजपाने मोतीलाल साहू यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर भूपेश बघेल २७,००० हून अधिक मतांनी विजयी झाले होते. विजय बघेल हे चौथ्यांदा त्यांचे काका भूपेश बघेल यांच्या विरोधात रिंगणात उतरणार आहेत. विजय बघेल यांनी २००३मध्ये पाटणमधून भूपेश बघेल यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्याचा पराभव झाला. २००८मध्ये विजय बघेल यांनी भूपेश बघेल यांचा ७५०० मतांनी पराभव केला होता. त्यानंतर २०१३ मध्येही काका-पुतणे आमनेसामने होते, मात्र पुतण्याला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
२०१३मधील निवडणूकीचे निकाल
काँग्रेसचे भूपेश बघेल यांना ६८१८५ मते मिळाली.
भाजपाचे विजय बघेल यांना ५८४४२ मते मिळाली.
२००८मधील निवडणूकीचे निकाल
भाजपाचे विजय बघेल यांना ५९ हजार मते मिळाली.
काँग्रेसचे भूपेश बघेल यांना ५११५८ मते मिळाली.
२००३मधील निवडणूकीचे निकाल
काँग्रेसचे भूपेश बघेल यांना ४४२१७ मते मिळाली.
राष्ट्रवादीचे विजय बघेल यांना ३७३०८ मते मिळाली.
२०१८च्या छत्तीसगड निवडणुकीचा निकाल-
छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. राज्यात सध्या लोकसभेच्या एकूण ११ आणि राज्यसभेच्या ५ जागा आहेत. छत्तीसगडमध्ये एकूण २७ जिल्हे आहेत. राज्यात एकूण ५१ जागा सर्वसाधारण, १० जागा अनुसूचित जातीसाठी आणि २९ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. २०१८मध्ये झालेल्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. राज्यातील विधानसभेच्या एकूण ९० जागांपैकी भाजपाला केवळ १५ जागा मिळाल्या होत्या. त्याच वेळी, काँग्रेसने सर्वाधिक ६८ विधानसभा जागा जिंकून सरकार स्थापन केले. आता भाजप अनेक मुद्द्यांवर तयारी करण्यात व्यस्त आहे आणि ज्या जागांवर तो पराभूत झाला त्याची कारणे शोधून पुढील रणनीती आखत आहे.