मुंबई - महाराष्ट्रा पाठोपाठ देशाच्या राजकारणातही अनेक ठिकाणी काका-पुतण्यांचा वाद रंगलेला दिसतो. राज्यात शरद पवार-अजित पवार, राज ठाकरे-बाळ ठाकरे, अशी उदाहरणं असताना उत्तर प्रदेशातील यादवी आता चर्चेत आली आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काका शिवपाल यादव यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. मात्र शिवपाल यादव यांनी पुतण्यासाठी माघार घेत कुटुंबाला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि अखिलेश यादव यांचे वडील मुलायम सिंह यादव यांच्या जन्मदिनी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन शिवपाल यादव यांनी केले आहे. तसेच आपल्याला मुख्यमंत्रीपदात रस नसल्याचे सांगत त्यांनी अखिलेश यांच्या मनातील भितीही कमी केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे उत्तर प्रदेशातील राजकीय समिकरणे पुन्हा बदलण्याची शक्यता आहे.
समाजवादी पार्टी आणि प्रगतीशिल समाजवादी पक्ष एकत्र आल्यास 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोठा बदल घडू शकतो. अखिलेशने समजून घेतले तर समाजवादीचे सरकार स्थापन होऊ शकते, असं सांगताना त्यांनी मुख्यमंत्रीपदात आपल्याला स्वारस्य नसल्याचे स्पष्ट केले.
शिवपाल यादव यांनी पुतण्या अखिलेश यादव यांच्यासमोर माघार घेतल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी समाजवादी पक्षाने 2022 च्या निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.