मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थानात काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 03:58 AM2019-05-26T03:58:51+5:302019-05-26T03:59:53+5:30

भाजपच्या झंझावातामध्ये पंजाब, राजस्थान या कॉँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

Uncomfortable in the Congress party in Madhya Pradesh, Punjab, Rajasthan | मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थानात काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता

मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थानात काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता

Next

- विश्वास खोड 
भाजपच्या झंझावातामध्ये पंजाब, राजस्थान या कॉँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. अंतर्गत कुरबुरी उफाळल्या आहेत. कर्नाटकात जनता दलाच्या (सेक्युलर) मदतीने सत्ता मिळविलेल्या कॉँग्रेसने शुक्रवारी सकाळी तातडीने बोलाविलेल्या बैठकीनंतर राज्यातील सत्ता अबाधित राहील, असा दावा केला आहे. छत्तीसगडमध्ये ५ महिन्यांपूर्वी भाजपची सत्ता असल्याने आणि या पक्षाच्या मतदानाची टक्केवारी वाढल्याने कॉँग्रेसजनांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. तर मध्य प्रदेशात आमचे आमदार फुटणार नाहीत, अशी ग्वाही दिग्विजयसिंह यांना द्यावी लागली.
सिद्धू - अमरिंदर सिंग यांच्यात वाद
पंजाबमध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्या विरोधात आघाडी उघडली. आपण लवकरच राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी आज सांगितले. कॉँग्रेसच्या पराभवाचे खापर सिद्धू यांच्यावर फोडले असून त्यांचा उल्लेख निष्क्रिय मंत्री असा केला आहे. भटिंडा आणि गुरुदासपूरमधील हार सिद्धू यांच्या बेताल वक्तव्यांमुळे झाली, असा त्यांचा दावा आहे.
पायलट - गहलोत कुरबुर
राजस्थानातील अंतर्गत कुरबुरी उफाळल्या आहेत. मुख्यमंत्री पदासाठी विद्यमान मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात खूप रस्सीखेच झाली होती. तडफदार युवक असलेल्या पायलट यांना मुख्यमंत्रिपद मिळाले नसल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले होते. गेल्या ५ महिन्यांतील त्यांच्यातील कुरबुरी कॉँग्रेसला लोकसभा निवडणुकीत महागात पडल्या. सर्व २५ जागांवर पक्षाला धूळ चारत भाजपने वर्चस्व सिद्ध केले. त्यातच त्यांचा मुलगा वैभव गहलोत याचाही पराभव झाला. त्यामुळे राजकीयदृष्ट्या दुर्बल झालेल्या गहलोत यांना पक्षांतर्गत विरोध वाढू शकतो.
>आमदार आमच्यासोबतच -दिग्विजयसिंह
दरम्यान, मध्य प्रदेशातील सरकार पाडले जाण्याबद्दलच्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी आमदार फोडण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचा आरोप केला. आमची सत्ता राज्यात असणे भाजपला सहन होत नाही. आमदार फोडले जात असले तरी आम्हाला पाठिंबा देणारे आणि आमचे स्वत:चे आमदार यांच्याबद्दल संपूर्ण विश्वास आहे, असा दावा त्यांनी केला. प्रज्ञासिंह यांच्याकडून या ज्येष्ठ नेत्याला हार पत्करावी लागली.
>छत्तीसगडमध्ये धास्ती
भाजपने छत्तीसगडमध्ये ११पैकी ९ जागांवर विजयश्री खेचून आणली. २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र कॉँग्रेसने मोठा विजय मिळविला. ९० पैकी ६८ जागा जिंकल्या. भाजपला फक्त १५ जागांवर समाधान मानावे लागले. या पराभवातून धडा घेत भाजपने एकाही विद्यमान खासदाराला निवडणुकीसाठी संधी दिली नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपला ३२.९७ टक्के मते मिळाली. ती लोकसभा निवडणुकीत वाढून ५०.७० टक्क्यांवर गेली. कॉँग्रेसला विधानसभा निवडणुकीत ४३.४ टक्के मते मिळाली होती, ती या निवडणुकीत ४० टक्क्यांवर आली. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत प्रथमच २ जागा जिंकूनही कॉँग्रेसमध्ये मरगळलेपणा आहे.

Web Title: Uncomfortable in the Congress party in Madhya Pradesh, Punjab, Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.