ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - ' ऊन असो वा पाऊस वा बर्फाचा तेज मारा, कोणत्याही परिस्थिती आम्ही सीमेवर १२-१२ तासं उभं राहून डोळ्यात तेल घालून पहारा देत असतो. आम्ही आमचे कर्तव्य चोखपणे बजावत असतानाच आम्हाला धड पुरेसे खायलाही मिळत नाही' असे सांगत सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका जवानाने व्हिडीओच्या माध्यमातून व्यथा मांडत अधिका-यांकडून कशी वाईट वागणूक मिळते, याचा पाढा वाचला. २९व्या बटालियनमधील तेज बहादूर यादव या जवानाच्या व्हिडीओने सध्या चांगलीच खळबळ माजली असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला आहे. या प्रकरणी सर्व स्तरातून टीका होत असून देशाचे रक्षण करणा-या जवानांना मिळणा-या वागणूकीबद्दल संताप व्यक्त होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बीएसएफने मात्र त्या जवानाबद्दल प्रश्न उपस्थित केले असून तो जवानच बेशिस्त असल्याचा आरोपही केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिका-यांवर आरोप करणा-या तेज बहादूर यादव याची कारकीर्दही उत्तम नसून ते अनेकवेळा वादात सापडले आहेत. गेल्या २० वर्षापासून ते बीएसएफमध्ये कार्यरत असून त्यांना ३ ते ४ वेळा मोठी, कडक शिक्षाही भोगावी लागल्याचे समजते. एवढेच नव्हे तर यादव यांनी आपल्याच सहकाऱ्यावर बंदूक रोखल्याचाही आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. त्यामुळेच यादव यांनी केलेले आरोप किती खरे आहेत, याबद्दल प्रश्न उपस्थित होतो. याप्रकरणी बीएसएफद्वारे एक पत्रक जारी करण्यात आले आहे. ‘ तेज बहादूर यादव अनेकवेळेस न सांगता ड्युटीवर गैरहजर रहायचा. त्याला काऊन्सेलिंगची गरज होती आणि तो दारूच्याही आहारी गेला होता.' असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे एकंदरच या प्रकरणाच्या सत्य-असत्याबद्दल शंका निर्माण झाली आहे.
काय आहे हे नेमकं प्रकरण?
तेज बहादूर यादव या जवानाने एक व्हिडीओ शेअर करून त्यामध्ये जवानांना कशी वाईट वागमूक दिली जाते, हे कथन केले आहे. जवानांना पुरेसे व चांगले अन्न मिळत नाही, तसेच अनेकवेळा उपाशीपोटी झोपावे लागते, असेही त्याने नमूद केले आहे.
'तुम्हाला दिसायला खूप चांगले चित्र दिसत असलं तरी आम्ही याठिकाणी अत्यंत दयनीय अवस्थेत राहतो. मात्र, अशाही परिस्थितीत आम्ही प्रामाणिकपणे आमचे कर्तव्य बजावतो. पण, आम्हाला पुरेसे खायलाच मिळत नसेल, तर आम्ही काय करावे? मग आम्ही आमचे कर्तव्य कसे पार पाडायचे ? या निकृष्ट अन्नामुळे आमची परिस्थिती काय झाली असेल, याची कल्पना तुम्ही करू शकता' असे बहादूरने व्हिडिओत म्हटले आहे. मात्र त्याने या सर्व प्रकारासाठी सरकारला दोषी न ठरवता सैन्यातील भ्रष्ट अधिका-यांवर खापर फोडले आहे. सरकार आम्हाला सर्वकाही देते. मात्र, अधिकारी बाहेर सर्व विकून टाकतात. प्रसारमाध्यमांनी या सगळ्याची दखल घ्यावी आणि याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी तेज बहादूरने केली.