ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 05 - केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून नव्या नियमांची घोषणा करण्यात आली. या नव्या नियमांनुसार बेशिस्त वर्तवणूक आणि कामकाजात अडथळे निर्माण करणाऱ्या प्रवाशांना चाप बसणार आहे.
एअर इंडियाने बेशिस्त वर्तवणूक आणि कामकाजात अडथळे निर्माण प्रवाशांसाठी एक लिस्ट तयार केली आहे. ही लिस्ट ‘नो-फ्लाय लिस्ट’ असे असेल. या ‘नो-फ्लाय लिस्ट’ ज्या प्रवाशांना टाकण्यात येईल, त्या प्रवाशांना एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करता येणार नाही.
बेशिस्त वर्तवणूक आणि कामकाजात अडथळे निर्माण करणाऱ्या प्रवाशांच्या कारवाईसाठी तीन प्रकारांमध्ये या लिस्टमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या प्रकारात आक्षेपार्ह हावभाव, दुसऱ्या प्रकारात ढकलणे, मारणे किंवा लैंगिक छळ यासारखी कृती तर तिसऱ्या प्रकारात जीवे मारण्याचा प्रयत्न यावरून शिक्षा निश्चित केली जाईल. त्यानुसार संबंधित प्रवाशांवर अनुक्रमे तीन महिने, सहा महिने आणि दोन वर्षांसाठी निर्बंध घालण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचा-याला मारहाण केली होती. त्यानंतर अशा घटना घडून नयेत म्हणून एअर इंडियाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. दरम्यान, त्यावेळी खासदार रवींद्र गायकवाड संसदेच्या अधिवेशनासाठी एअर इंडियाच्या विमानाने पुण्याहून दिल्लीला निघाले होते. त्यांच्याकडे बिझनेस क्लासचे ओपन तिकीट होते. पण आपणास इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आल्याची त्यांची तक्रार होती. मात्र या विमानात बिझनेस क्लास नाही आणि केवळ इकॉनॉमी क्लासच आहे, याची कल्पना खा. गायकवाड यांच्या स्वीय सचिवाला देण्यात आली होती, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी नमूद केले.
विमानात आल्यानंतर आपल्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांशी वाद घालायला सुरुवात केली. विमान दिल्लीला उतरल्यानंतर सर्व प्रवासी विमानातून खाली उतरले. मात्र खा. गायकवाड विमानातून खाली उतरण्यास तयार नव्हते. त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलावून घेण्यात आले. त्यावेळी खा. गायकवाड यांनी ६0 वर्षीय आर. सुकुमार या ड्युटी मॅनेजरला शिवीगाळ करीत चपलेने मारले.
‘मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही, मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो, अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले’’, अशी कबुली रवींद्र गायकवाड यांनी दिली होती.
या घटनेनंतर भारतीय विमान संघानं रवींद्र गायकवाडांवर बंदी घातली आहे. एअर इंडिया, जेट एअरवेज, इंडिगो, गो एअर, स्पाईस जेट या विमान कंपन्यांनी गायकवाड यांच्या कृत्याचा जाहीर निषेध करत त्यांना नो फ्लाय यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला टाटा समूहातील कंपन्यांनीही पाठिंबा दर्शवला असून त्यामुळे व्हिसारा आणि एअर एशियाच्या विमानांमध्येही रविंद्र गायकवाडांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.