नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मोठी घोषणा केली आहे. भारतानं अवकाश संशोधन क्षेत्रात मोठं यश मिळवल्याचं मोदी म्हणाले आहेत. भारतानं मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडला आहे. अशा प्रकारे मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे. काही वेळापूर्वीच आमच्या वैज्ञानिकांनी अंतरिक्षात 300 किमी दूर लो अर्थ ऑरबिट लाइव्ह सॅटेलाइटला पाडलं आहे. भारतानं अवकाश संशोधन क्षेत्राच्या इतिहासात स्वतःचं नाव कोरलं असून, देशासाठी हा गर्वाचा दिवस आहे, असंही मोदी म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांना संबोधित करताना म्हणाले, अंतराळ विज्ञान क्षेत्रात भारताचा प्रवेश झाला आहे. उपग्रहरोधक शस्त्र म्हणजेच A-SAT ने लाईव्ह सॅटेलाइटचा वेध घेतल्यानं भारताला अवकाश संशोधन क्षेत्रात मोठं यश मिळालं आहे.
या मिशनमुळे भारताला नवी ताकद मिळाली आहे. अंतराळ क्षेत्रात भारताचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.