वायनाड : केरळमधील वायनाड जिल्ह्यामध्ये दरडी कोसळून मरण पावलेल्यांची संख्या २१८ वर पोहोचली आहे, तसेच २०६ जण अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटनेचा तडाखा बसलेल्या लोकांच्या बचावकार्यासाठी लष्कराच्या मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपच्या जवानांनी सुमारे अविश्रांत परिश्रम करून चूरालमला येथे १९० फुटांचा एक बेली ब्रिज बांधला. त्या तुकडीचे नेतृत्व मेजर सीता शेळके या मराठमोळ्या महिला लष्करी अधिकाऱ्याने केले.
मुंडक्काई आणि चुरालमला या भागांमध्ये झालेल्या दुर्घटनेत मोठमोठे दगड, माती, चिखल यांच्या ढिगाऱ्याखाली अनेक घरे दबली गेली व त्यात शेकडो लोक अडकून पडले. त्यांच्या सुटकेसाठी बचावकार्य अहोरात्र सुरू आहे. खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकले आहेत का, याचा झेव्हर रडार आणि चार रिको रडारमार्फत शोध घेतला जात आहे. केरळ सरकारच्या विनंतीवरून ही रडार विशेष विमानाने दिल्लीहून त्या राज्यात आणण्यात आली. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले की, दुर्घटनास्थळी सुरू असलेले बचावकार्य अंतिम टप्प्यात आहे. बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध दरडींच्या ढिगाऱ्याखाली घेतला जात आहे.
केदारनाथ मार्गावरील दहा हजार लोकांची सुटकाकेदारनाथ मंदिराच्या मार्गावरील उद्ध्वस्त मार्गावर अडकलेल्या यात्रेकरूंना वाचवण्याची मोहीम रविवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच होती. आतापर्यंत १०,५०० हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. तर काही लोकांना हेलिकॉप्टरने स्थलांतरित करण्यात आले आहे. केदारनाथ, भिंबली आणि गौरीकुंडमध्ये सुमारे १३०० यात्रेकरू अडकले आहेत.
मद्रास इंजिनीअरिंग ग्रुपमधील एकमेव महिला अधिकारीमेजर सीता शेळके या लष्कराच्या बंगळुरू येथील मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपमधील एकमेव महिला अधिकारी आहेत. या ग्रुपच्या ७० जवानांच्या टीमने चुरारमला येथे बांधलेल्या बेली ब्रिजचे बांधकाम शेळके यांच्या नेतृत्वाखाली १६ तासांत बांधून पूर्ण केला. दरडीच्या ढिगाऱ्याखालून सुटका केलेल्या लोकांना उपचारांसाठी तत्काळ हलविण्याकरिता ब्रिजचा मोठा उपयोग होत आहे. तसेच त्याचा वापर करून बचावपथके दुर्घटनाग्रस्त मुंडकाई गावात जलदगतीने पोहोचू शकली. सीता शेळके या २०१२मध्ये भारतीय लष्करात दाखल झाल्या. मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये त्या ग्रुप मेजर म्हणून कार्यरत आहेत. त्या मुळच्या अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असून चेन्नई ओटीए येथून त्यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले होते.
२१८ - जणांचा मृत्यू९० - महिला मृत९८ - पुरुष मृत३० - मुलांचा बळी१५२ - ओळख पटली.५१८ - जण जखमी
सुपरस्टार मोहनलाल यांची ३ कोटी रुपयांची मदत- दरडी कोसळल्यामुळे विस्थापित व्हावे लागलेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी मल्याळी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल यांनी शनिवारी आपल्या विश्वशांती फाउंडेशनतर्फे तीन कोटी रुपयांची मदत जाहीर केली. - दुर्घटना घडलेल्या मुंडक्काई आणि चूरलमाला, पुंचिरीमट्टम आदी ठिकाणांना त्यांनी भेट देऊन पाहणी केली.
कुठे काय झाले ?- झारखंडमध्ये पावसामुळे अनेक रस्ते वाहून गेले आहेत, झाडे उन्मळून पडली असून, घरांचे नुकसान झाले आहे. एक पूलही कोसळला आहे.- कोलकातामध्ये विमानतळासह अनेक भागांत पाणी साचले.- केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या बिहारमधील व्यक्तीचे नोव्हेंबरमध्ये लग्न होणार होते.- हिमाचल प्रदेशातील १९० रस्त्यांवर वाहतूक ठप्प. - मध्ये प्रदेशात घर कोसळल्याने दोन मुलांचा मृत्यू, पाच जण जखमी.- चीनच्या शांक्सी प्रांतात पूल कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३८ वर, दोन डझन लोक अद्याप बेपत्ता आहेत.