...तर मोदींचा वारासणीत धुव्वा उडेल- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2018 07:29 PM2018-04-08T19:29:15+5:302018-04-08T19:29:15+5:30
राहुल गांधींचा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद
सर्व विरोधक एकत्र आल्यास लोकसभा निवडणूक जिंकणे तर सोडाच, पंतप्रधान मोदींना त्यांची वाराणसीमधील जागादेखील राखता येणार नाही, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले. बंगळुरुत पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधताना राहुल यांनी विरोधी पक्षांच्या एकजुटीवर विश्वास व्यक्त केला. '2019 ची लोकसभा निवडणूक जिंकणे तर दूरच राहिले, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष मोदींच्या विरोधात एकत्र आल्यास, पंतप्रधानांना वाराणसीची जागाही गमवावी लागेल,' असे राहुल म्हणाले. यावेळी बोलताना राहुल गांधींनी तिसऱ्या आघाडीची शक्यता फेटाळून लावली.
'खरे सांगायचे झाल्यास भाजप पुढील निवडणूक जिंकेल, असे मला वाटत नाही. त्यामुळे 2019 मध्ये परिस्थिती सामान्य होईल, असे मला वाटते,' असे राहुल गांधी यांनी म्हटले. दलितांच्या वाढत्या आक्रोशाबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी हे उत्तर दिले. 'दोन मुख्य मुद्द आहेत. विरोधी पक्षांची एकजूट एका विशिष्ट उंचीवर पोहोचली की त्यांना (भाजपला) निवडणूक जिंकणे अवघड होईल. सध्या विरोधी पक्षांची एकजूट होताना दिसत आहे. त्यामुळे भाजपचा पराभव निश्चित आहे,' असेही राहुल यांनी म्हटले.
उत्तर प्रदेश, बिहार आणि तामिळनाडूमध्ये विरोधी पक्ष एकत्र येत असल्याकडे राहुल गांधींनी उपस्थितांचे लक्ष वेधले. 'विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. अशा परिस्थितीत ते (भाजप) कुठून जागा जिंकणार? आणि राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, पंजाबमध्ये आम्ही भाजपला पराभूत करु,' असे राहुल यांनी म्हटले. कर्नाटकमध्ये 12 मे रोजी विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे राहुल गांधी सहाव्यांदा कर्नाटकच्या दौऱ्यावर आले आहेत.
विरोधी पक्ष एकत्र येत असले तरी, या पक्षांच्या नेत्यांच्या मनात नेतृत्त्व करण्याची इच्छा आहे. त्यामुळे विरोधकांच्या आघाडीच्या भविष्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याबद्दलही राहुल गांधी यांना छेडण्यात आले. त्यावर बोलताना, आम्ही यातून निश्चित मार्ग काढू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'आम्ही यावर तोडगा काढू. माणसांना कसे सांभाळून घ्यायचे, हे काँग्रेसला माहित आहे. आम्हाला कशाचाही अहंकार नाही. आम्ही लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत नाही. त्यामुळे या परिस्थितीतून नक्कीच मार्ग काढला जाईल,' असे राहुल यांनी म्हटले.