नवी दिल्ली - कोणत्या अधिकाराखाली सरसंघचालक मोहन भागवत अयोध्येत राम मंदिर बांधणार असल्याचं बोलत आहेत ? असा प्रश्न एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विचारला आहे. काही दिवसांपुर्वी मोहन भागवत यांनी अयोध्येतील वादग्रस्त जागेवर केवळ राम मंदिरच उभारण्यात येईल तेथे अन्य काही उभारले जाता कामा नये, असं म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना असदुद्दीन ओवेसी यांनी मोहन भागवत सरन्यायाधीश आहेत का ? असा संतप्त सवाल विचारला.
'कोणत्या अधिकाराखाली मोहन भागवत अयोध्येत मंदिर बांधणार असल्याचं बोलत आहेत ? अजूनही प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. मोहन भागवत सरन्यायाधीश आहेत का ? कोण आहेत ते ?', असं असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे.
अयोध्येतील वादग्रस्त जागेवर केवळ राम मंदिरच उभारण्यात येईल तेथे अन्य काही उभारले जाता कामा नये, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह मोहन भागवत यांनी केले होते. विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या धर्म संसदेत हिंदू धर्मातील संत तसेच मठप्रमुख, साधू अशा सुमारे दोन हजार जणांपुढे बोलताना भागवत म्हणाले की, अयोध्येत जे दगड आणण्यात आले आहेत, त्यातूनच आपल्याला राम मंदिर उभारायचे आहे. ते मंदिर उभारले जाईल आणि त्यावर भगवा फडकेल, असा दिवस जवळ आला आहे.
अनेक वर्षाची तपश्चर्या, प्रयत्न आणि त्याग या साºयांमुळेच राम मंदिर उभारणे आता शक्य होत आहे. अर्थात हे प्रकरण न्यायालयप्रविष्ट आहे, हेही आपण लक्षात ठेवायला हवे. त्यामुळे राम मंदिरासाठी सर्वांनी मिळून जनजागृती करणे आवश्यक आहे, असेही मोहन भागवत यांनी बोलून दाखवले. या धर्म संसदेत बोलताना संघप्रमुखांनी देशात संपूर्ण गोहत्याबंदी असायलाच हवी, याचा पुनरुच्चार केला.
'अयोध्येत राम मंदिर बांधा आणि लखनऊत मस्जिद'अध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर एकीकडे राम मंदिर आणि बाबरी मस्जिद वादात मध्यस्थी करत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे शिया सेंट्रल वक्फ बोर्डाने एक प्रस्ताव ठेवला आहे. अयोध्येत राम मंदिर बांधलं जावं, पण सोबतच लखनऊत मस्जिददेखील बांधली जावी, असा प्रस्ताव शिया सेंट्रल वक्फ बोर्डाने ठेवला आहे.