केंद्र सरकारवरील अविश्वास प्रस्तावाची कारणे समजून घ्या, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्याशी खास संवाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 01:10 PM2023-07-30T13:10:17+5:302023-07-30T13:11:30+5:30

लोकसभेतील काँग्रेसचे नेते आणि पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी हे सध्या चर्चेत आहेत. ते राज्यात ममता बॅनर्जी यांच्या विरोधात जोरदार लढा देत आहेत आणि केंद्रातील तृणमूलच्या नेत्यांची त्यांना गळाभेट घ्यावी लागत आहे. आदेश रावल यांनी त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत.

Understand the reasons behind the no-confidence motion against the central government, an exclusive interaction with Congress leader Adhir Ranjan Chaudhary | केंद्र सरकारवरील अविश्वास प्रस्तावाची कारणे समजून घ्या, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्याशी खास संवाद 

केंद्र सरकारवरील अविश्वास प्रस्तावाची कारणे समजून घ्या, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्याशी खास संवाद 

googlenewsNext

अविश्वास प्रस्ताव आणण्याचा उद्देश काय?   
अविश्वास प्रस्ताव फक्त संख्याबळासाठी आणला जात नाही. अविश्वास प्रस्ताव म्हणजे सरकारवर आमचा अविश्वास आहे. कारण आम्ही वारंवार पंतप्रधानांना सभागृहात येण्याची विनंती करूनही ते येत नाहीत. पंतप्रधान असल्याने त्यांनी यायला हवे. पंतप्रधान सभागृहाबाहेर काही बोलतात; पण, सभागृहात बोलताना संकोच करतात. ज्या मुद्द्यावरून संपूर्ण जगात आपली प्रतिमा डागाळली जात आहे त्यावर पंतप्रधानांनी सभागृहात भाष्य करावे, असा आमचा हेतू होता. पण, पंतप्रधानांनी संपूर्ण विरोधकांची मागणी फेटाळून लावल्याने आम्ही संसदीय पद्धतीत उपलब्ध पर्याय निवडला. आम्हाला माहीत आहे की, आम्ही हरणार आहोत. संख्याबळ त्यांच्याकडे आहे. पण, हा मुद्दा मांडण्यास आणखी पर्याय नाही. 

काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी सांगितले की, राज्यसभेत त्यांचा माइक बंद करण्यात आला. तुम्हालाही लोकसभेत अशी अडचण येते का? 
यापेक्षा अधिक त्रास होतो. सभागृहात आम्हाला आमचा मुद्दा मांडण्याची संधी मिळत नाही. मला बोलण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, दुसरीकडे मंत्री पीयूष गोयल आणि प्रल्हाद जोशी म्हणाले की, अधीर रंजन चौधरी यांना बोलू देऊ नका. त्यानंतर माझा माइक बंद करण्यात आला. मिनिटे आणि तासांचा मुद्दा सोडा, आम्हाला एक सेकंदही मिळत नाही. 

संसदेत भविष्यातील रणनीती काय? 
सर्वसामान्यांचे प्रश्न मांडायचे आहेत. अविश्वास प्रस्तावावर चर्चा करायची आहे. दिल्लीच्या वटहुकुमावर आमचा पक्ष राज्यसभेत विरोध करेल. 

प्रथम रजनी पाटील यांना निलंबित केले. आता संजय सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. तुम्ही याकडे कसे पाहता?  
संजय सिंह यांना यासाठी निलंबित करण्यात आले; कारण, जेव्हा दिल्ली वटहुकुमावर राज्यसभेत चर्चा होईल तेव्हा संख्याबळ कमी असावे. राज्यसभेत सत्ताधारी पक्षाचा पराभव होऊ शकतो. त्यामुळे संख्याबळ कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही सरकारची रणनीती आहे. 

दिल्लीच्या नेतृत्वाने तुम्हाला ममता बॅनर्जींबाबत मवाळ भूमिका घेण्यास सांगितले आहे का?  
मवाळ किंवा कठोर हा मुद्दा नाही. मी जे पाहतो तेच बोलतो. मला माहीत आहे की, नेतृत्वाला काय हवे आहे. 

डावे पक्ष आणि ममता बॅनर्जी यांना सोबत कसे घेणार? 
या विषयावर अजून वेगळी चर्चा झालेली नाही, जेव्हा होईल तेव्हा सांगू. दिल्ली काँग्रेस, पंजाब काँग्रेस आणि बंगालमध्येही अडचणी आहेत हे मला माहीत आहे. प. बंगालमध्ये आघाडी झाली आणि जागांचे वाटप झाले तर आपल्याला कळवू. 

‘इंडिया’ समूहात अशी कोणती ताकद आहे, जी मोदी यांना पराभूत करेल? 
ताकद आहे म्हणून तर सत्ताधारी घाबरले आहेत. आमचा निशाणा बरोबर लागला आहे. 

राहुल गांधी यांच्या खटल्याबाबत काय होणार?  
हे सर्वोच्च न्यायालयावर अवलंबून आहे. त्यांच्यावर कोणताही विशिष्ट आरोप नाही. कटकारस्थान करून त्यांना अडकविण्यात आले आहे, हे सर्वांना माहीत आहे. न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे व राहुल गांधी यातून बाहेर पडतील. पुन्हा एकदा संसदेच्या कामकाजात सहभागी होतील, अशी आशा आहे. 

Web Title: Understand the reasons behind the no-confidence motion against the central government, an exclusive interaction with Congress leader Adhir Ranjan Chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.