ऑनलाइन लोकमतकराची, दि. २५ - १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट आणि इतर अनेक गुन्ह्यांसाठी भारताला हवा असलेला अडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याला आपला पाय गमवावा लागणार आहे. पायाला गँगरीन झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असून, गँगरीन पासून वाचण्यासाठी पाय कापणे हा एकमेव पर्याय त्याच्यासमोर असल्याचे वृत्त आहे.प्रसारमाध्यमांतून आलेल्या बातम्यांनूसार दाऊदच्या पायाचे गँगरीन अगदी शेवटच्या टोकाला पोहोचले आहे. त्यामूळे दाऊदचा जीव वाचवायचा असेल तर, पाय कापणे हे इतकेच आमच्या हाती असल्याचे दाऊदच्या डॉक्टरांनी म्हटले आहे. दरम्यान, दाऊदवर सध्या कराचीच्या लिकायत नॅशनल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याची सुत्रांची माहिती आहे.
गँगरीनमुळे पाय कापावा लागल्यास दाऊदच्या हालचालींवर परिणाम होणार आहे. हा परिणाम केवळ शारीरिक पातळीवरच असणार नाही. तर, त्याच्या एकूण काळ्या धंद्यांवरही होणार आहे. त्यामुळे गँगरीनच्या आजारात दाऊदला त्याचा पाय गमवावा लागला तर या अंडरवर्ल्ड डॉनच्या अस्तित्वाविषयीच प्रश्न उपस्थित राहू शकतात
दरम्यान, मुंबईत आपल्या गुन्हेगारी कारकिर्दीची सुरूवात करणाऱ्या दाऊदने १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर देशाबाहेर पळ काढला होता. तेंव्हापासून मुंबई पोलिस आणि केंद्रीय गुप्तचर विभाग त्याच्या मागावर आहेत. मात्र, पाकिस्तानात लपून बसलेला दाऊद अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. विशेष म्हणजे त्याची काही अपवादात्मक छायाचित्रे वगळता त्याची सध्याची अवस्था काय आहे ? हे ही फारसे बाहेर येत नाही. देशाबाहेर असलेला दाऊद आपल्या हस्तकांच्या माध्यमातून भारत आणि जगभरातील विविध देशात आपला काळा धंदा चालवतो.