Rajasthan GST Notice News: आपल्या देशात अनेकविध गोष्टी घडत असतात, ज्याची चर्चा देशभरात होत असते. असेच एक प्रकरण राजस्थानमधील जैसलमेर येथून समोर आले आहे. यामध्ये एकीकडे हाताला काम नाही, नोकरी नाही, अशा स्थितीत एका बेरोजगार तरुणाला जीएसटी भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. ही रक्कम थोडी-थोडकी नसून, तब्बल १ कोटी ३९ लाखांच्या टॅक्ससंदर्भातील आहे. नोटीस पाहताच तरुण हादरून गेला आहे.
राजस्थानच्या जैसलमेरमध्ये राहणाऱ्या एका गरीब बेरोजगार तरुणाला एक कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी भरण्याची नोटीस मिळाली आहे. या तरुणाच्या नावावर जीएसटी थकीत असल्याचे दाखवले गेले असून, तो लवकर न भरल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे. ही नोटीस केंद्रीय आयुक्तालय दिल्ली उत्तर विभागाकडून पाठवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाच्या पॅनकार्डचा वापर करून दिल्लीत व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाने चुकीच्या पद्धतीने करोडोंची उलाढाल केली. यानंतर केंद्रीय जीएसटी विभागाने जैसलमेरच्या या गरीब तरुणाला ०१ कोटी ३९ लाख ७९ हजार ४०७ रुपयांची जीएसटी नोटीस पाठवली आहे.
वडील शेतीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात
दिल्ली उत्तर आयुक्तालयाकडून रिदवा जैसलमेर येथील रहिवासी असलेले नरपतराम यांचा मुलगा नवलाराम मेघवाल याला नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत या तरुणाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन घटनेची माहिती दिली. यानंतर या प्रकरणी तपास करून गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत. नरपतराम या तरुणाने तो बेरोजगार असल्याचे सांगितले. सध्या वडिलांवर अवलंबून आहे. वडील शेतीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना तीन दिवसांपूर्वी केंद्रीय जीएसटी विभागाकडून नोटीस मिळाली आहे. यामध्ये १ कोटी ३९ लाख ७९ हजार ४०७ रुपये कर थकीत असल्याचे सांगण्यात आले. या तरुणाला दिल्लीत बोलावण्यात आले आहे.
पॅनकार्डाचा दुरुपयोग करून फर्म बनवली आणि नोटीस आली
नरपतराम यांनी सांगितले की, त्याची कुठलीही फर्म नाही. त्याने कोणताही व्यवसाय केलेला नाही. कोणीतरी पॅनकार्डचा दुरुपयोग करून फर्म बनवली आणि व्यवसाय केला. यामुळे ही नोटीस मिळाली आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर आधार कार्ड, पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रांचा गैरवापर करून एक फर्म स्थापन केल्याचे आढळून आले. सदर व्यक्ती दिल्ली येथील असून त्याने हा बनाव केला आहे. दरम्यान, नरपतराम शिक्षक भरती परीक्षेची तयारी करत आहे, तो सुरतगडमध्ये शिकत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"