नवी दिल्ली : देशातील बेरोजगारीचा दर ९.२ टक्क्यांवर पोहोचला आहे, त्यामुळे तरुण त्रस्त आहेत, त्यांना नोकरीसाठी भटकंती करावी लागत आहे, परंतु सरकारला या तरुणांच्या समस्या दिसत नाहीत, त्यांच्या हाका ऐकूही येत नाहीत. याउलट सर्व आकडेवारीकडे दुर्लक्ष करून ते खोटे पसरविण्यात व्यस्त आहेत, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस (जनसंपर्क) जयराम रमेश म्हणाले की, अनियमित धोरणे, घराणेशाही आणि ईडी, आयटी, सीबीआयचे छापेराज या कारणांमुळे २०१४ पासून भारत कमी गुंतवणुकीच्या चक्रात अडकला आहे.
श्रीमंत-गरिबांतील दरी रुंदावली
देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी रुंदावत असल्याचा दावा करत काँग्रेसने या दोन वर्गांच्या मासिक खर्चात सुमारे २० पट तफावत असल्याचे म्हटले आहे.
पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही एका बातमीचा हवाला दिला, ज्यात म्हटले आहे की, पाच टक्के नागरिकांचा मासिक उपभोग खर्च केवळ १३७३ रुपये आहे, तर सर्वात श्रीमंत आणि गरीब कुटुंबांचा मासिक उपभोग खर्च २० पट आहे. २०१२ ते २०२१ पर्यंत देशात निर्माण झालेल्या संपत्तीपैकी ४० टक्क्यांहून अधिक संपत्ती फक्त एक टक्का लोकसंख्येकडे गेली आहे. २१ अब्जाधीशांकडे ७० कोटी भारतीयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.
काँग्रेसचा दावा...
देशातील ८३ टक्के तरुण बेरोजगार आहेत.
२०-२४ वयोगटातील तरुणांमधील बेरोजगारीचा दर ४४.४९ टक्के.
देशात डझनावारी पेपर फुटत आहेत.
३० लाख सरकारी पदे रिक्त.
बेरोजगारीला कंटाळून दर तासाला दोन तरुणांची आत्महत्या.
तरुणांना नोकरीसाठी रशिया, इस्रायलमध्ये जावे लागते.