नवी दिल्ली : देशात गेल्या ५० वर्षांतील सर्वाधिक बेकारी सध्या निर्माण झाली आहे. भारतामध्ये श्रीमंतांचा व गरीबांचा असे दोन वेगवेगळे भारत वसत आहेत. या दोन भारतांमधील दरी खूप वाढली आहे. हा सर्व मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाला होता. त्याच्या आभारप्रदर्शन प्रस्तावावरील चर्चेत राहुल गांधी म्हणाले की, देशाला भे़डसावणाऱ्या समस्या तसेच प्रचंड प्रमाणात वाढलेल्या बेकारीचा या अभिभाषणात काहीही उल्लेख नव्हता. नोकरशाहीने मांडलेल्या संकल्पनांची जंत्री राष्ट्रपतींच्या अभिभाषणात होती. श्रीमंत व गरीब अशा दोन भारतांतील दरी मिटविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले पाहिजेत. राहुल गांधी म्हणाले की, गेल्या वर्षी देशातील तीन कोटी युवक बेकार झाले. ते सध्या रोजगाराच्या शोधात आहे. मात्र त्यांच्या हाताला मोदी सरकारने काम मिळवून दिलेले नाही. त्याऐवजी नरेंद्र मोदी मेक इन इंडिया, स्टार्ट-अपबद्दलच भाषणे देतात.
४० टक्के संपत्ती मुठभरांच्या हातीकाँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, भारतातील ४० टक्के संपती मुठभरांच्या हाती एकवटली आहे. ८४ टक्के भारतीयांची कमाई कमी झाली आहे. त्यामुळे गरिबीच्या दिशेने ते ढकलले जात आहेत. देशातील असंघटित कामगार क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. त्यामुळे मेक इन इंडियाची मोहिम यशस्वी होणार नाही.
मोदी सरकार करत आहे, आवाज दडपण्याचा प्रयत्नमोदी सरकार संघराज्यातील घटकांचा आवाज दडपण्यासाठी न्याययंत्रणा, निवडणूक आयोग, पेगॅसस यांचा वापर करत आहे. १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्याचवेळी राजेशाही व्यवस्था नष्ट होऊन लोकशाही आली. पण तीच राजेशाही व्यवस्था भाजप पुन्हा देशात आणण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी देशातील तीन कोटी युवक बेकार झाले. ते सध्या रोजगाराच्या शोधात आहे. - राहुल गांधी, काँग्रेस नेते