नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून देशातली बेरोजगारी वाढत असल्याचं आकड्यांमधून समोर आलं होतं. अनेक जण बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. दिल्लीत त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळतं आहे. कारखाना बंद झाल्यानं 44 वर्षीय व्यक्तीनं मुलगा आणि मुलीचा कथित स्वरूपात गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वतःही हैदरपूर बादली मोर मेट्रो स्टेशनवर ट्रेनच्या समोर उडी मारून जीवन संपवलं, पोलिसांनी ही माहिती दिली आहे.घटनास्थळावरून कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट मिळालेली नाही. आत्महत्या केलेली मधुर मलानी नावाची व्यक्ती गेल्या सहा महिन्यांपासून सँड-पेपर उत्पादन करणारा कारखाना आर्थिक संकटातून जात आहे. मधुरचे आई-वडील त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत पुरवत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मधुर हा पत्नी रुपाली, मुलगी समीक्षा(14) आणि सहा वर्षीय मुलगा श्रेयांशबरोबर दिल्लीतल्या शालीमार बागेत राहत होता. रुपाली घरी नसताना त्यानं मुलांचा गळा दाबून त्यांची हत्या केली. मुलांच्या हत्येचं कारण पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आल्यानंतरच समजणार आहे.दोन्ही मुलांची हत्या केल्यानंतर आरोपीनं हैदरपूर बादली मोर मेट्रो स्टेशनवर पोहोचला आणि त्यानं ट्रेनच्या समोर उडी मारून आपलं आयुष्य संपवलं. त्याला रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित केले. त्यामुळे मेट्रो सेवाही विस्कळीत झाली होती. त्या आरोपीची पत्नी बाजारात गेली होती, घरी परतल्यानंतर तिनं मुलांचा मृत्यू झाल्याचं पाहिलं. तिथे पती नसल्याचंही तिनं सांगितलं. पोलीस उपायुक्त विजयंत आर्य यांनी आयपीसी कलमांतर्गत गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास सुरू आहे.
नोकरी नसल्यानं पोटच्या मुलांचे खून करून मेट्रोसमोर आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 10:04 AM