अहमदाबाद – गुजरातच्या राजकोटमध्ये हार्टअटॅकच्या एका घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ३६ वर्षीय महिला तिच्या घरात जेवण बनवत होती. तेव्हा अचानक तिच्या छातीत दुखू लागले त्यानंतर महिला काही सेकंदात बेशुद्ध झाली. कुटुंबाने तिला उपचारासाठी नजीकच्या दवाखान्यात तातडीने दाखल केले. परंतु त्याठिकाणी डॉक्टरांनी या महिलेला मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे तिच्या पोस्टमोर्टम रिपोर्टमधून समोर आले.
एकाएकी महिलेच्या मृत्यूने कुटुंबात शोककळा पसरली. दुर्दैव म्हणजे त्यादिवशी घरात तिच्या वाढदिवसाची तयारी सुरू होती. सगळे आनंदात होते तेव्हाच हा दु:खद प्रसंग घडला. राजकोटमध्ये प्रसिद्ध डिजे धर्मेशभाई उर्फ अक्की राठोड यांची ३६ वर्षीय कन्या निशिता बेन राठोड संध्याकाळी त्यांच्या घरात जेवण बनवत होती. त्यावेळी अचानक त्यांची तब्येत ढासळली. त्या बेशुद्ध झाल्या. कुटुंबाने त्यांना दवाखान्यात दाखल केले परंतु तोवर त्यांचा मृत्यू झाला होता.
निशिता बेन राठोड यांचा वाढदिवस होता. ज्यादिवशी वाढदिवस होता त्याच दिवशी महिलेच्या मृत्यूने कुटुंबाला धक्का बसला. मृत महिलेला २ मुले आणि १ मुलगी आहे. आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुले तयारी करत होती. कुटुंब आनंदात होते. मात्र महिलेच्या एक्झिटने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
घरात सुरू होती बर्थ डेची तयारी
३६ वर्षीय निशिता बेन राठोड यांच्या वाढदिवशी घरात बर्थ-डेची तयारी सुरू होती. तिन्हीही मुले आनंदात होती. परंतु त्यांच्या आनंदावर विरजन पडले. वाढदिवसालाच त्यांनी आईला गमावले. पोस्टमोर्टम रिपोर्टनुसार, गर्भाशयाची पिशवी फाटल्याने महिलेला हृदयविकाराचा झटका आला. निशिता बेनला कुठलाही अन्य आजार नव्हता. राठोड कुटुंबावर आलेल्या संकटामुळे आसपासच्या शेजाऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. राजकोटमध्ये याआधीही ४० वर्षापेक्षा कमी लोकांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले आहे. जास्तीचा तणाव घेऊ नये आणि नियमित व्यायाम करावा असा सल्ला डॉक्टरांनी लोकांना दिला आहे.