आपल्या समाजावार आजही अंधश्रद्धेचा पगडा कायम आहे. याचा उत्तम नमुना ओडिशामध्ये पहायला मिळत आहे. ज्या ओडिशाच्या लोकांनी तिहेरी रेल्वे अपघातात शेकडो जखमींसह मृतदेहांना बाहेर काढले त्याच ओडिशामध्ये हे मृतदेह ठेवल्याने हायस्कूलची इमारत रातोरात भूतबंगला वाटू लागली आहे.
गेल्या आठवड्यात बालासोर जिल्ह्यात झालेल्या भीषण रेल्वे अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर हजारावर प्रवासी जखमी झाले होते. कोरोमंडल एक्स्प्रेस मालगाडीवर आदळली होती. या एक्स्प्रेसचे डबे दुसऱ्या ट्रॅकवर कोसळल्याने समोरून येणारी ट्रेनही अपघातग्रस्त झाली होती. अशा या तिहेरी अपघातात आजही ८० हून अधिक मृतदेहांची ओळख पटलेली नाहीय. हे मृतदेह जागा कमी पडतेय म्हणून हॉस्पिटलजवळच्या एका हायस्कूलमध्ये ठेवण्यात आले होते. आता या शाळेत जाण्यास मुले आणि पालक घाबरू लागले आहेत.
अपघात फार भीषण होता, परंतू तो ताजाच असल्याने व पुढील आठवड्यांत शाळा सुरु होत असल्याने पालकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. याची माहिती मिळताच बालासोरचे जिल्हाधिकारी दत्तात्रेय भाऊसाहेब तातडीने पाहणीसाठी गेले होते. तेथील परिस्थिती पाहता त्यांनी हायस्कूल प्रशासनाने परवानगी दिली तर इमारत पाडली जाऊ शकते, असे म्हटले आहे.
बाहानगा हायस्कूलची ही इमारत ६५ वर्षे जुनी आहे. या शाळेत शेकडो मुले शिक्षण घेतात. उन्हाळी सुट्ट्यांमुळे ही शाळा बंद होती. रेल्वे अपघातानंतर याच शाळेचा वापर मृतदेह ठेवण्यासाठी केला गेला होता. रेल्वे अपघातात प्रवाशांचा अकाली मृत्यू झाला होता. यामुळे या परिसरात नाही नाही त्या चर्चा सुरु झाल्या आहेत. किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये या घटनेचा वाईट परिणाम होईल म्हणून हायस्कूल पाडण्याची चर्चा सुरु झाली आहे.
एनसीसीचे विद्यार्थीच मदतीला धावलेले....महत्वाचे म्हणजे या शाळेचे एनसीसीचे विद्यार्थी अपघाताचे वृत्त समजताच होते त्या परिस्थितीत मदतीला धावले होते. नंतरचे रेस्क्यू ऑपरेशनही या विद्यार्थ्यांच्या मदतीनेच पार पाडले गेले होते. हेच विद्यार्थी काळजाचे पाणी झाले तरी मृतदेह या शाळेत घेऊन आले होते. परंतू असे असले तरी पालकवर्गात भीतीचे, चिंतेचे वातावरण आहे. १८ जूनपासून शाळा सुरु होत आहे.