पंजाब : नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंजाबमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे पाठविला आहे. याबाबतची माहिती नवज्योतसिंग सिद्धू यांनी ट्विटरवरुन दिली आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा 10 जूनला दिला होता. मात्र, याबाबत आज खुलासा केला आहे. दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू आता पुढे काय निर्णय घेणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मतभेद होते. लोकसभा निवडणुकांनंतर पंजाब राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या पहिल्या बैठकीला हजर न राहता त्याऐवजी नवज्योतसिंग सिद्धू यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.
सिद्धूंचे ‘स्थानिक स्वराज्य’ खाते काढले; ऊर्जा खात्याची दिली जबाबदारीनवज्योतसिंग सिद्धू यांच्याकडील स्थानिक स्वराज्य संस्थांचे खाते काढून घेऊन त्यांना ऊर्जामंत्री करण्यात आले होते. गेल्या लोकसभा निवडणुकांत पंजाबच्या शहरी भागामध्ये काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळे नवज्योतसिंग सिद्धू यांच्याकडे असलेले स्थानिक स्वराज्य संस्थांचे खाते काढून घेण्याचा विचार पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी बोलून दाखविला होता. त्यामुळे अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील मतभेद विकोपाला गेले होते.
(नवज्योत सिद्धू देणार राजीनामा?; राजकीय संन्यास घेणार का?)
नवज्योतसिंग सिद्धू यांना 'आप'ची ऑफरमुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील शाब्दिक चकमक अद्याप थांबलेली नाही. त्यातच नवज्योतसिंग सिद्धू यांना आम आदमी पक्षातून ऑफर देण्यात आली होती. पंजाब विधासभेतील विरोधीपक्षनेते हरपाल सिंग चीमा यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांना आम आदमी पक्षात येण्याची ऑफर दिली होती. नवज्योतसिंग सिद्धू यांचा आम आदमी पक्षात पुरेसा मानसन्मान केला जाईल, अशी ग्वाही देखील हरपाल सिंग यांनी दिली होती.