श्रीनगर - सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सीमारेषेवर सुरू असलेल्या तणावादरम्यान पाकिस्तानकडून पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मात्र सतर्क जवानांनी घुसखोरीचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे. रविवारी ( 18 फेब्रुवारी ) नियंत्रण रेषेजवळ बडगाम परिसरात संशयित हालचाली निदर्शनास आल्या तसंच लष्करी तळाच्या दिशेनं ग्रेनेडदेखील डागण्यात आले.
विध्वंसक कारवायांसाठी कुख्यात असलेल्या पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (बॅट)नं हा हल्ला केल्याचे बोललं जात आहे. मात्र या भ्याड हल्ल्याला सतर्क जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर देत घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. दोन्ही बाजूनं झालेल्या गोळीबारात तीन जवान जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान,शोधमोहीमेदरम्यान एक मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. नियंत्रण रेषेजवळ रविवारी (18 फेब्रुवारी) संध्याकाळी 5.25 वाजण्याच्या सुमारास संशयित हालचाली निदर्शनास आल्या. लष्कर तळापासून 100 मीटर अंतरावर या हालचाली दिसून आल्यानंतर जवानांनी त्यादिशेनं गोळीबार केला. यावेळी लष्करी तळावरही दुस-या बाजूनं ग्रेनेड डागण्यात आले. मात्र काही वेळातच त्याचा खात्मा करण्यात आला.
यानंतर शोधमोहीमेदरम्यान परिसरात चार आरपीजीसहीत एक मृतदेह आढळून आला. या हल्ल्याचं नियोजन पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमकडून आखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सतर्क जवानांमुळे पाकिस्तानच्या या प्रयत्नांना यश आले नाही. पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमकडून वारंवार विध्वंसक हल्ले करुन भारतीय जवानांचे मृतदेहांची विटंबना करण्यात येते. या टीमकडून दहशतवाद्यांसोबत मिळून घुसखोरी करुन हल्ले घडवले जातात. बॉर्डर अॅक्शन टीममध्ये पाकिस्तानी सैनिकांव्यतिरिक्त दहशतवादीदेखील सहभागी असतात.
एयरफोर्स स्टेशनमध्ये घुसखोरीचा प्रयत्न दरम्यान, बडगाम येथील एअरफोर्स स्टेशनमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणा-या एका अज्ञात व्यक्तीला कंठस्नान घालण्यात आले आहे. सुरक्षा क्षेत्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणा-या या व्यक्तीला सुरुवातीला ताकीद देण्यात आली होती. मात्र यानंतरही त्यानं ग्रेनेड हल्ला न रोखल्यानं त्याचा खात्मा करण्यात आला.