नवी दिल्लीः दोन वर्षांपूर्वी देशविरोधी घोषणा दिल्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावर आज दिल्लीत अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून तो थोडक्यात बचावला आहे.
कॉन्स्टिट्युशन क्लब जवळच्या चहाच्या स्टॉलवर उमर खालिद आपल्या काही साथीदारांसोबत उभा होता. इतक्यात, पांढरा शर्ट घातलेली एक अज्ञात व्यक्ती त्याच्या दिशेनं आली. त्या माणसानं त्याला ढकललं आणि त्याच्यावर गोळी झाडली. पण, खालिदचा तोल गेल्यानं तो खाली पडला आणि बचावला. हे पाहून हल्लेखोरानं तिथून पळ काढला. उमर खालिदसोबतच्या तरुणांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण हवेत गोळ्या झाडत तो निसटला. त्यावेळी त्याच्या हातातून पिस्तूल खाली पडली.
संसद परिसरापासून थोड्याच अंतरावर कॉन्स्टिट्युशन क्लब आहे. उमर खालिदवरील हल्ल्याची गंभीर दखल घेत, पोलिसांनी या व्यक्तीचा माग काढण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, संसदेवर झालेल्या हल्ल्यातील दोषी अफझल गुरूच्या फाशीचा निषेध करत देशविरोधी घोषणा दिल्याबद्दल उमर खालिदवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता. त्याला अटकही करण्यात आली होती. परंतु, कोर्टाने त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना जामिनावर सोडलं होतं.