CM पिनराई विजयन यांचा समान नागरी कायद्याला विरोध, भाजपवर केला गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 21:15 IST2023-06-30T21:15:14+5:302023-06-30T21:15:48+5:30
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी समान नागरी कायद्यावरुन भाजपवर सडकून टीका केली आहे.

CM पिनराई विजयन यांचा समान नागरी कायद्याला विरोध, भाजपवर केला गंभीर आरोप
Pinarayi Vijayan On Uniform Civil Code: देशभरात समान नागरी कायद्याची (UCC) चर्चा सुरू आहे. अनेक विरोधी पक्ष या कायद्याला कडाडून विरोध करत आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही समान नागरी कायद्याला विरोध केला असून, या मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) नेते पिनाराई विजयन यांनी शुक्रवारी (30 जून) मीडियाशी बोलताना म्हणाले, हा कायदा भारतीय जनता पक्षाचा निवडणूक अजेंडा आहे. केंद्राच्या या निर्णयाकडे देशातील बहु-सांस्कृतिक विविधता पुसून टाकण्याची आणि केवळ बहुसंख्य 'एक देश, एक संस्कृती'चा जातीय अजेंडा लागू करण्याची योजना म्हणून पाहिले जाऊ शकते. केंद्र सरकार आणि विधी आयोगाने समान नागरी संहितेच्या संदर्भात उचललेली पावले मागे घ्यावीत,' असे विजयन म्हणाले.
पिनाराई विजयन पुढे म्हणाले की, समान नागरी कायद्याबाबत वाद निर्माण करणे ही संघ परिवाराचा जातीय फूट पाडण्याचा निवडणूक डाव आहे. भारताच्या बहुसंख्याकतेला कमकुवत करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांचा प्रतिकार करा आणि विविध समुदायांमध्ये लोकशाही चर्चेद्वारे होणाऱ्या सुधारणांना समर्थन द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पीएम मोदींच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
27 जून रोजी भोपाळमध्ये भाजपच्या एका कार्यक्रमात पीएम मोदींनी समान नागरी कायद्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चेने जोर धरला. दुहेरी कायद्याने देश कसा चालेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. या मुद्द्यावरुन विरोधी पक्ष मुस्लिम समाजाला भडकवत असल्याचा आरोपही पंतप्रधान मोदींनी केला होता.