नवी दिल्ली : गरिबांचे सबलीकरण तसेच युवकांना उज्ज्वल भविष्य प्रदान करणारा हा अर्थसंकल्प आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे स्वागत केले. ते म्हणाले की, आशा व आत्मविश्वास जागविणारा हा अर्थसंकल्प आहे. देशाच्या विकासासाठी समाजातील तळागाळातल्या लोकांचे पॉवरहाऊसमध्ये रूपांतर करण्याचे काम अर्थसंकल्प करेल. पर्यावरण, वाहतूक, क्लीन एनर्जी या विषयांवर त्यामध्ये लक्ष देण्यात आले आहे. कृषीक्षेत्रामध्ये रचनात्मक बदल करण्यासाठी अर्थसंकल्पाद्वारे निश्चित मार्ग आखून दिला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवभारताच्या निर्माणाचे महत्त्वाचे दस्तावेज असलेले हे ग्रीन बजेट देशाच्या विकासाला आणखी गती देईल. त्याचा मोठा फायदा मध्यमवर्गाला मिळेल. कररचना सोपी करणे तसेच देशात अद्ययावत पायाभूत सुविधा उभारणे ही कामे या अर्थसंकल्पातून साध्य होतील. या अर्थसंकल्पामुळे उद्योग व उद्योजक या दोघांनाही बळ मिळेल आणि देशाच्या विकासात महिलांचा सहभागही वाढेल. गरीब, दलित, शेतकरी, शोषित व असंघटित लोकांच्या सबलीकरणासाठी केंद्र सरकार ठोस पावले उचलत आहे. देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची बनविण्याचा मनोदय असून तो आम्ही साध्य करणारच.श्रीमंतधार्जिणा अर्थसंकल्प : राहुल गांधीवित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना गाठून पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, हा अर्थसंकल्प श्रीमंतधार्जिणा असेल. सीतारामन या अंबानीधार्जिण्या की शेतकऱ्यांच्या बाजूने उभ्या राहाणा-या असतील असे पत्रकारांनी विचारताच राहुल गांधी यांनी सांगितले की, हा चांगला प्रश्न आहे.नवभारताच्या प्रगतीचा पाया - अमित शहा‘नवभारत सर्वसमावेशक व प्रगत राष्ट्र होण्यासाठी पाया रचण्याचे काम या अर्थसंकल्पाने केले आहे. नवभारताविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असलेला दृष्टिकोन स्पष्ट करणारा व १३० कोटी भारतीयांच्या मेहनतीला न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. शेतकरी, युवक, महिला, गरीब आर्थिक क्षेत्र, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा व अन्य क्षेत्रामध्ये मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात जे उत्तम काम झाले त्याची झलकही या अर्थसंकल्पामध्ये दिसते, असे अमित शहा यांनी सांगितले.संरक्षण खर्चाबाबत मौन : पी. चिदम्बरमसंरक्षणावर किती खर्च करणार याची आकडेवारी अर्थसंकल्पात नाही. हा जनतेवर अन्याय आहे अशी टीका माजी केंद्रीय वित्तमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी केली. ते म्हणाले की, देशाचा कृषी विकासदर २.९ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. तो ४ टक्क्यांपर्यंत नेण्याचा मनोदय मोदी सरकारने व्यक्त केला असला तरी ते साध्य कसे करणार याबद्दल मौन बाळगले आहे.
Union Budget 2019: गरिबांचे सबलीकरण, युवकांना उज्ज्वल भविष्य देणारा अर्थसंकल्प - पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 6:05 AM