नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकार-2 चा हा पहिला अर्थसंकल्प आहे. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत 88 अर्थसंकल्प सादर झाले आहेत. आतापर्यंतच्या अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणांच्या लांबीवर नजर टाकल्यास मनमोहन सिंग यांनी दिलेलं भाषण सर्वात मोठं होतं. तर एच. एम. पटेल यांनी सर्वात छोटेखानी भाषण केलं होतं. मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून केलेलं काम आजही अनेकांच्या लक्षात आहे. देशाच्या आतापर्यंतच्या अर्थमंत्र्यांच्या भाषणांवर नजर टाकल्यास मनमोहन सिंग यांचं भाषण सर्वात मोठं होतं. 1991 मध्ये सिंग यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी दिलेल्या भाषणात 18,177 शब्द होते. तर 1977 मध्ये सर्वात लहान भाषण पाहायला मिळालं. अर्थमंत्री एच. एम. पटेल यांच्या भाषणात केवळ 800 शब्द होते. अर्थसंकल्प सादर करणारे पंतप्रधानजवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या तीन पंतप्रधानांनी आतापर्यंत अर्थसंकल्प सादर केले आहेत. 1970 मध्ये इंदिरा गांधींकडे पंतप्रधान पदासोबतच अर्थमंत्रीपददेखील होतं. अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या. यानंतर आता तब्बल 49 वर्षांनंतर निर्मला सीतारामन यांच्या रुपात एक महिला देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे.
Union Budget 2019: आतापर्यंत सर्वात मोठं अर्थसंकल्पीय भाषण कोणी दिलं? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 11:00 AM