नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी बुधवारी अर्थसंकल्प २०२२ यावर भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मोदी सरकारच्या कामगिरीबाबत मोदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मंगळवारी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प(Union Budget 2022) सादर केला. परंतु हा संकल्प दिशाहिन असल्याची टीका विरोधकांनी केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना म्हणाले की, देश मागील १०० वर्षात आलेल्या सर्वात मोठ्या महामारीशी लढत आहे. कोरोना व्हायरस(Coronavirus) या महामारी जगासमोर अनेक आव्हानं घेऊन आली. जगाला त्या टोकाला उभं केले ज्याठिकाणाहून टर्निंग पॉईंट गरजेचा आहे. यापुढे आपण जे जग पाहणार आहोत ते तसं नसणार जसं आपण कोरोना महामारीपूर्वी पाहत होतो असं मोदींनी सांगितले.
जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला
तसेच कोरोनानंतर एक नवीन वर्ल्ड ऑर्डर बनणार आहे. त्याचे संकेतही दिसत आहे. आज भारताकडे पाहण्याचा जगाच्या दृष्टीकोनात मोठा बदल झाला आहे. आता जगातील लोकं भारताकडे अधिक मजबूत रुपाने पाहत आहे. त्यासाठी आपल्या देशाला वेगाने पुढे नेणं आपल्यासाठी गरजेचे आहे. हा काळ नव्या संधी आणि नव्या संकल्पना यांना पुढे घेऊन जाणारा आहे असं मोदींनी कार्यकर्त्यांना सांगितले.
भारतात परकीय चलनाचा साठा झपाट्याने वाढला
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज भारताचा जीडीपी २ लाख ३० हजार कोटींच्या आसपास आहे.सध्या भारताचं परकीय चलन साठा $६३० अब्ज पार झाला आहे. २०१३-१४ मध्ये भारताची निर्यात २ लाख ८५ हजार कोटी रुपयांची होती. आज भारताची निर्यात ४ लाख ७० हजार कोटींच्या आसपास पोहोचली आहे. कोरोनाच्या या काळातही भारताने आपल्या अर्थव्यवस्थेच्या बळावर जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू गरीब आणि तरुणांवर आहे. मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे असं त्यांनी सांगितले.
३ कोटी गरीब लखपती झाले
गेल्या ७ वर्षात आपल्या सरकारने ३ कोटी गरीबांना पक्की घरे देऊन त्यांना लखपती बनवले आहे. आता नळाचे पाणी जवळपास ९ कोटी ग्रामीण घरांपर्यंत पोहोचू लागले आहे. यापैकी गेल्या दोन वर्षांत जलजीवन अभियानांतर्गत ५ कोटींहून अधिक नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. यावर्षी सुमारे ४ कोटी ग्रामीण कुटुंबांना नळजोडणी देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे असंही पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना सांगितले.
दरम्यान, जे गरीब होते ते झोपडपट्टीत राहत होते, आता त्यांच्याकडे स्वतःचे घर आहे. या घरांसाठीची रक्कमही पूर्वीच्या तुलनेत वाढली असून मुलांना अभ्यासासाठी जागा मिळावी म्हणून घरांचा आकारही वाढला आहे. मोठी गोष्ट म्हणजे यातील बहुतांश घरे महिलांच्या नावावर आहेत, म्हणजेच आपण महिलांना घराची मालकिन बनवलं आहे असंही पंतप्रधान म्हणाले.