नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प Union Budget 2022 सादर करत आहेत. अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा मोठा परिणाम झाल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. देशभरात देशात ६० लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध करणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. तसेच स्टार्टपसाठी नाबार्डच्या माध्यमातून तरुणांना आर्थिक मदत करणार असल्याचेही निर्मला सीतारामन यांनी यावेळी म्हटलं आहे.
२०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन सांगितले की, डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. देशाचा विकास दर ९.२७ टक्के असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. इतक नाही तर पुढील पाच वर्षात ६० लाख नवे रोजगार निर्मिती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ३० लाख अतिरिक्त नोकऱ्या देण्याची क्षमता आहे. सर्वसमावेशक विकास हेच सरकारचं ध्येय असेल, असं त्यांनी म्हटलं.
पीएम गती शक्ती योजनेच्या माध्यमातून पायाभूत सुविधेसाठी मोठी गुंतवणूक करणार आहे. तसेच रस्ते, रेल्वे, हवाई, जल वाहतुकीसाठी गुंतवणूक केली जाणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात येणार आहे, असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे.
गेल्या चार वर्षांमध्ये कोट्यवधी तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आता नोकरी मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे सरकारने तत्काळ ज्या जागा रिकाम्या आहेत, त्या जागांवर भरती सुरू करावी, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांकडून करण्यात येत होती. याचपार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सकाळी ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच जगभरात सुरु असलेल्या कोरोना महामारीचा उल्लेख केला. या महामारीच्या काळातही भारत आपली विकास यात्रा कायम ठेवेल, अशी अपेक्षा निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे.