नवी दिल्ली - देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून बऱ्याच मुद्द्यांना स्पर्श करण्यात आला. इन्कम टॅक्स आणि इतर सामान्यांशी संबंधित असलेल्या कररचनेत काहीही बदल करण्यात आले नाही. परंतु क्रिप्टोकरन्सी संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी डिजिटल रूपी नावाची डिजिटल करन्सी लवकरच चलनात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तर, कररचनेतही काही सवलत मिळाली नाही. त्यामुळे, यंदाच्या बजेवर विरोधकांकडून टीका होत आहे.
भाजप नेत्यांकडून अर्थसंकल्पाचे कौतुक करण्यात येत असून देशाला बलशाली बनविणारा अर्थसंकल्प असल्याचं भाजपकडून सांगण्यात येतंय. मात्र, काँग्रेस नेत्यांकडून बजेटवर टीका करण्यात येत आहे. सर्वसामान्यांची घोर निराशा झाल्याचं विरोधक म्हणत आहेत. तर, देशात क्रिप्टोकरन्सीचं विधेयक अद्याप आलं नसताही आता या डिजिटल करन्सीवर टॅक्स कसा घेतला जातो, असा प्रश्न रणदीपसिंग सुरजेवाला यांनी विचारला आहे. तर,पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोजक्याच शब्दात अर्थसंकल्पावर टीका केली. बेरोजगारी आणि महागाईंने दबलेल्या सर्वसामान्य लोकांसाठी बजेटमध्ये काहीही नाही. सरकार मोठ-मोठ्या गोष्टीत हरवल्याचं दिसून येत आहे. हे एक पेगासस स्पीन बजेट आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
भव्यदिव्य स्वप्न दाखवली - थोरात
मोदी सरकारने आपल्या नेहमीच्या पद्धतीने या बजेटमधून मोठमोठे आकडे फेकून भव्य दिव्य स्वप्न दाखवली आहेत. गुलाबी स्वप्नांशिवाय सर्वसामान्यांना काहीही मिळाले नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, या अर्थसंकल्पाची मांडणी केली गेली आहे. पुन्हा एकदा डिजीटल स्वप्न दाखवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केला असून त्यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प सर्व वर्गाची घोर निराशा करणारा दिशाहीन व अर्थहीन संकल्प आहे, अशी प्रतिक्रिया विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, निर्मला सीतारामन यांचे खूप खूप आभार!', असं ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तर, 'आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या दोन्ही योजना देशात रोजगार निर्मिती करत आहेत', अशा मोजक्या शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली.