नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थमंत्री म्हणून आपला चौथा 2022-23 चा अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी देशातील पायाभूत सुविधांसाठी यावेळी मोठ्या घोषणा केल्या. यंदाच्या अर्थसंकल्पात 2047 पर्यंतची रुपरेषा असल्याचं सांगत 'पीएम गतिशक्ती योजने'च्या 'मास्टर प्लान'वर सरकार काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य करदात्यांना कुठलिही सवलत मिळाली नाही. त्यामुळे, सर्वसामान्यांची निराशाच झाली आहे. सितारमण यांनी डिजिटल यंत्रणांवर लक्ष केंद्रीत करत अनेक योजनांची घोषणा केली. त्यात, मानसिक आरोग्यसाठी नॅशनल टेलीमेंटल सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
निर्मला सितारमण यांनी बजेट 2022 मध्ये मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये, डिजिटल पेमेंटसाठी यंत्रणा, वन नेशन वन रेशन, 5 जी सेक्टर, ई-एज्युकेशनसाठी चॅनेल्स, ई-पासपोर्ट यांसारख्या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. तर एटीएम, नेटबँकिंग, पेमेंट अॅप्सद्वारे टपाल बचत इंटरऑपरेबल करून ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण लोकांची सोय केली जाणार आहे. RuPay आणि UPI द्वारे एमडीआर फीमध्ये सबसिडी देण्याचा निर्णय एक सकारात्मक पाऊल असल्याचे सांगण्यात येत आहे.
सितारमण यांनी नॅशनल टेलीमेंटल सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. आयआयटी बंगळुरूच्या माध्यमातून तांत्रिक सुविधा पुरविण्यात येतील. त्यामध्ये, आरोग्य योजना आणि आरोग्य सुविधांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येईल. विशेष आरोग्य ओळख आणि उत्तम आरोग्य सेवांची पूर्तता निश्चित करण्यात आली आहे. कोरोना कालावधीत अनेकांच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यावर परिणाम झाला आहे. एका आकडेवारीनुसार मानसिक आरोग्यावर परिणाम झालेल्या 40 ते 60 टक्के रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच, आरोग्याप्रति जागरुक राहण्यासाठी सरकारकडून नॅशनल टेलीमेंटल सेंटर सुरू करण्यात येत आहे.
या सेंटरद्वारे लोकांच्या मानसिक समस्या आणि त्यांचे कॉन्सलिंग ऑनलाईन पद्धतीने होईल. याबाबत सविस्तर योजना कशारितीने कार्यान्वित होईल, हे हळुहळु स्पष्ट होईल. दरम्यान, मनोरुग्ण तज्ज्ञांकडून या योजनेचं स्वागत करण्यात आलं आहे.