केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करत विविध मुद्द्यांबाबत आगामी योजना जाहीर केल्या. वाहतूक आणि दळणवळण या विभागासाठी काही विशिष्ट योजनांची अंमलबजावणी केली जाईल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. डोंगराळ भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी रोप-वे सेवेचं प्रमाण वाढवलं जाईल. तसेच, २५ हजार किलोमीटरचे नवे रस्ते बांधले जातील, असंही या अर्थसंकल्प सादरीकरणात स्पष्ट करण्यात आले.
वाहतूक आणि दळणवळण विभागासाठी येणाऱ्या काळात विशेष तरतूद व प्लॅनिंग करण्यात आल्याचे अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या. पीएम गतीशक्ती योजने अंतर्गत वाहतूक आणि वस्तूंचे दळणवळण अधिक सुकर करण्याच्या उद्देशाने पुढील वर्षभरात जास्तीत जास्त एक्स्प्रेस वे बांधले जातील. राष्ट्रीय महामार्गांचे जाळे आणखी २५ हजार किलोमीटरवर पसरवण्याची योजना आहे. तसेच, इतर छोट्या स्तरावरील सार्वजनिक सुविधांसाठी २० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असं निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं.
आजच्या अर्थसंकल्पात आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली. भारतातील अनेक पर्यटन स्थळे आणि ठिकाणे ही डोंगराळ भागात आहेत. त्यामुळे तेथे अनेकदा हिमवृष्टी किंवा भूस्खलनामुळे रस्तेवाहतुकीवर परिणाम होतो. पण येत्या आर्थिक वर्षात भारत सरकारकडून अशा डोंगराळ भागांमध्ये आणि जेथे रस्ते वाहतूक करण्यास अडथळा उद्भवतो अशा ठिकाणी रोप वे च्या माध्यमातून जनतेला जास्तीत जास्त सुकर प्रवास देण्याचा विचार आहे. असं अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या.