केंद्रीय अर्थसंकल्प 2023 म्हणजे अमृत काळातील पहिलाच अर्थसंकल्प असल्याचे म्हणत याने विकसित भारताच्या संकल्पाला आधार दिला असल्यचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. याच बरोबर, हा अर्थसंकल्प वंचित वर्गाला प्राथमिकता देणार आहे. या अर्थसंकल्पामुळे आशा आकांक्षांनी भरलेला समाज, शेतकरी वर्ग आणि मध्यमवर्गाची स्वप्ने पूर्ण होतील, असेही मोदी यांनी म्हटले आहे.
पीएम मोदी म्हणाले, 'अमृतकाळातील हा पहिला अर्थसंकल्प विकसित भारताचा विराट संकल्प पूर्ण करण्यासाठी एक भक्कम पाया निर्माण करेल. पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान अर्थात पीएम विकास, कोट्यवधी विश्वकर्मांच्या जीवनात मोठा बदल घडवून आनेन. गावापासून ते शहरापर्यंत राहणाऱ्या आपल्या महिलांच्या जीवनात बदल घडवून आण्याच्या दृष्टीनेही अनेक मोठी पावले उचलण्यात आली आहेत.'
पंतप्रधान म्हणाले, 'महिलांसाठी एक विशेष बचत योजनादेखील या अर्थसंकल्पात सुरू करण्यात येत आहे. हा अर्थसंकल्प सहकारी संस्थांना ग्रामीण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू बनवेल. नवीन प्राथमिक सहकारी संस्था निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षी योजनाही या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे. याच बरोबर, डिजिटल पेमेंटच्या यशाची कृषी क्षेत्रातही पुनरावृत्ती करावी लागणार आहे, असेही ते म्हणाले.
पीएम मोदी म्हणाले, 'आज मिलेट्स जगभरात लोकप्रिय होत असताना याचा सर्वाधिक फायदा भारतातील लहान शेतकऱ्यांच्या हात आहे. आता या 'सुपर फूड'ला 'श्री अन्न' नावाने एक वेगळी ओळख देण्यात आली आहे. 'श्री अन्ना'पासून आपल्या छोट्या शेतकऱ्याला शेती करणाऱ्या आदिवासी मंडळींना आर्थिक बळकटी मिळेल.'
मोदी म्हणाले, यावेळी इंफ्रास्ट्रक्चरवर 10 लाख कोटी रुपयांची अभूतपूर्व गुंतवणूक केली जाईल. ही गुंतवणूक तरुणांसाठी रोजगार आणि उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण करून देईल. याच बरोबर, 'समृद्ध आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मध्यम वर्ग ही एक मोठी ताकद आहे. या वर्गाला सशक्त बनविण्यासाठीच आम्ही टॅक्स रेट कमी केला आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.'