केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामन सलग सातव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने अग्निवीर योजना मागे घ्यावी असं म्हटलं आहे.
अर्थसंकल्पाबाबत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "यावेळी महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. सरकारने अग्निवीर योजना मागे घ्यावी. सरकार जीएसटीमधून दिलासा देते का? या सर्व मुद्द्यांवर हा अर्थसंकल्प कसा असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे."
"दिल्ली आणि पंजाबबाबत अर्थसंकल्पात नेमकं काय होणार हे पाहणे रंजक ठरेल. दिल्लीतील लोक लाखो कोटींचा टॅक्स भरतात. अशा स्थितीत दिल्लीला यावेळी काय मिळतं याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे" असं संजय सिंह यांनी म्हटलं आहे.
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. "गेली अनेक वर्षे आपण जे पाहतोय तेच होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या जवळच्या करोडपतींना आपल्या बजेटमधून मदत करणार आहेत. त्यांना नवीन ठिकाणी गुंतवणूक करण्याची सुविधा मिळेल. कंपन्यांना बँकांकडून दिलासा मिळावा, अशा सूचना माध्यमातून ऐकू."
"मध्यमवर्गीय, छोटे दुकानदार आणि प्रामाणिक करदात्यांना पोकळ आश्वासनांशिवाय काहीही मिळणार नाही" असं म्हणत गौरव गोगोई यांनी खोचक टोला लगावला आहे. २२ जुलैपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. संसदेचे अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. यावेळी २२ दिवसांच्या कालावधीत अधिवेशनात १६ बैठका होणार आहेत.