अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील या सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात केवळ निराशाच असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी अर्थसंकल्पावरून निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"मोदी 3.0 च्या अर्थसंकल्पात निराशा. शून्य + शून्य = शून्य. शेतकऱ्यांसाठी काहीही नाही. एमएसपीची हमी नाही, कर्जापासून दिलासा नाही, डिझेल, कीटकनाशके, औषधे आणि खतांच्या किमतीत कपात नाही, फक्त चर्चाच. तरुणांसाठी नवीन रोजगाराचा कोणताही मार्ग नाही. वर्षाला केवळ २० लाख तरुणांसाठी इंटर्नशिप, कापड, बांधकाम इत्यादींसाठी काही नाही" असं रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
"अर्थसंकल्पीय भाषणात SC-ST-BC या शब्दांचा उल्लेख नाही. लोकसभेत भाजपाच्या विरोधात मतदान न करण्याची शिक्षा असल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपाचा SC-ST-BC विरोधी चेहरा आहे. मध्यमवर्गीय आणि नोकरदारांना गेल्या १० वर्षांपासून कोणताही दिलासा नाही. देशातील गरिबांचे जीवनमान सुधारण्यासाठी 'शून्य' - फक्त पाच किलो रेशन घ्या आणि गरिबीत राहा" असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
निर्मला सीतारामन य़ांनी अर्थमंत्री म्हणून सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात गरीब, महिला, युवक आणि शेतकऱ्यांवर भर देण्यात आला आहे. सबका साथ, सबका विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. यावेळी अर्थसंकल्पात तरुणांसाठी २ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. मुद्रा लोनच्या मर्यादेत वाढ करण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. यापूर्वी या योजनेंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देण्यात येत होतं. आता त्यात वाढ करण्यात आली असून त्या अंतर्गत २० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार आहे.