हरीश गुप्ता नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात सप्टेंबरच्या प्रारंभी करण्यात येणारा प्रस्तावित बदल लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत, असे सरकारमधील सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन व म्यानमारच्या दौ-यावर जात असून, ते परतल्यावरच मंत्रिमंडळ विस्तार व फेरबदल केले जातील, असेही संकेत मिळत आहेत.राष्टÑपती रामनाथ कोविंद हे १-३ सप्टेंबरदरम्यान तिरुपती बालाजी व गुजरातेतील साबरमती आश्रमाला भेट देणार आहेत. ते २ सप्टेंबरला सायंकाळी दिल्लीत परततील व पुढील दिवशी गुजरातेत जातील.डोकलामचा तिढा काल सुटल्याने पंतप्रधान मंत्रिमंडळाचा विस्तार व फेरबदल लगेच करण्याची तसेच नवा संरक्षणमंत्री नियुक्त करण्याची घाई करण्याची शक्यता नाही. या कामासाठी ते आता भाजप अध्यक्ष अमित शहा, अरुण जेटली व संघ नेतृत्वाशी व्यापक विचारविनिमय करून निर्णय घेतील. संघाची सहा महिन्यांनी होणारी दोनदिवसीय आढावा बैठक मथुरेत २ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यामध्ये भाजपसह संघ परिवारातील संघटनांचे नेते सहभागी होत आहेत.अद्रमुकचे किमान पाच मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होणार आहेत, अशी चर्चा आहे. असे असले तरी त्या पक्षातील अंतर्गत भांडणे अद्याप संपलेली नाहीत. त्यांना आधी अंतर्गत भांडणे संपवावी लागतील व नंतरच पुढील वाटचाल करावी लागेल. जद (यू)चे दोन सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होण्याचे निश्चित झाले आहे. भाजप नेतृत्वाला उत्तर प्रदेशातील स्थितीचाही सामना करावा लागत आहे. या राज्यातील योगी सरकारमधील मुख्यमंत्र्यांसह पाच सदस्य ना विधानसभेचे सदस्य आहेत ना विधान परिषदेचे. विधान परिषदेत केवळ चार जागा रिक्त आहेत व त्या सर्व जागा भाजप जिंकेल; परंतु पाचव्या मंत्र्याचे काय करायचे, हा पेच आहे.पंतप्रधान मोदी हे ३ सप्टेंबर रोजी चीनच्या दौºयावर जात असून, ते ७ सप्टेंबर रोजी परतणार आहेत. त्यामुळे फेरबदल व विस्तार झालाच तर तो २ सप्टेंबरच्या सायंकाळी होऊ शकेल; अन्यथा ६ सप्टेंबर ते १६ सप्टेंबरदरम्यान तो होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा फेरबदल लांबणीवर , अद्रमुकला वेळ हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 3:23 AM