ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - शत्रू देशांकडून सायबर हल्ल्याचा धोका लक्षात घेता पंतप्रधान कार्यालयाने यापुढे केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मोबाइल फोन वापरावर बंदी घातली आहे. सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि चीनकडून सायबर हल्ल्यांचा धोका असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाच्या मुद्यांवर घेण्यात आलेले निर्णय तसेच धोरणासंबंधी अतिसंवेदनशील माहिती बाहेर फुटू नये, यासाठी खबरदारीच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मोबाईल फोन बंदीसंदर्भात अंमलबजावणी व्हावी, यासाठी केंद्रीय सचिवालयाकडून परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. 'केंद्रीय मंत्रिमंडळच्या कोणत्याही बैठकीत स्मार्ट फोन, मोबाइल फोन वापरण्यावर परवानगी नाकारण्यात आली असून, यासंबंधी प्रत्येक मंत्र्यांना त्यांच्या खासगी सचिवांनी पंतप्रधान कार्यालयाने घेतलेल्या निर्णयाची योग्य ती माहिती द्यावी', असे केंद्रीय सचिवालयाने या परिपत्रकाद्वारे सांगितले आहे.
आणखी बातम्या
गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सर्जिकल स्ट्राईकमुळे बिथरलेला पाकिस्तान आता स्मार्ट फोन, मोबाईल फोनसारख्या यंत्रामधील डेटा हॅक करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे. यासाठी सतर्कता म्हणून अतिमहत्त्वाच्या आणि संवेदनशील विभागात काम करणा-या कर्मचा-यांनाही त्यांचे मोबाईल फोन ऑफिसमधील कॅम्प्युटर आणि लॅपटॉपला जोडू नये, असे निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहेत. तसेच पंतप्रधान कार्यालय, संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय या भागातही स्मार्टफोनवर वापरावर बंदी घातली गेली आहे.