मणिपूरमध्ये सध्या हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. जमावाने गुरुवारी रात्री उशिरा केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री आरके रंजन सिंह यांचे इंफाळमधील कोंगबा येथील निवासस्थान जाळलं. मणिपूर सरकारनं याबाबत माहिती दिली आहे.
"मी सध्या अधिकृत कामासाठी केरळमध्ये आहे. सुदैवाने रात्री माझ्या घरात कोणालाही दुखापत झाली नाही. हल्लेखोरांनी पेट्रोल बॉम्ब आणले होते, माझ्या घराचा तळमजला आणि पहिला मजल्याला या हल्ल्यात नुकसान झालं आहे," अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना परराष्ट्र राज्यमंत्री आरके रंजन सिंह यांनी दिली.
दरम्यान, हिंसाचाराबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. आपल्या राज्यात जे घडतंय ते पाहून अतिशय वाईट वाटतंय. आताही आपण शांततेचं आवाहन करत राहू असं ते म्हणाले. राज्यातील हिंसाचारावर गुरुवारी मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. अनेक स्तरांवर चर्चा करत आहे, हिंसाचारात सहभागी असलेल्यांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. मणिपूरमध्ये बुधवारी हिंसाचाराची एक घटना घडली, ज्यात नऊ जणांचा मृत्यू आणि १० जण जखमी झाले होते.
शांतता समितीची स्थापना"आमच्या वचनबद्धतेनुसार आम्ही सर्वांशी संपर्क साधत आहोत. आम्ही विविध स्तरांवर चर्चा करत आहोत. राज्यपालांनी एक शांतता समितीही स्थापन केली आहे आणि शांतता समितीच्या सदस्यांशी सल्लामसलत सुरू होईल. मला आशा आहे की राज्यातील लोकांचा पाठिंब्यानं आम्ही हिंसाचार शांत करू," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.