नवी दिल्ली: लोकसभेत आज अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी चार वाजता अविश्वास प्रस्तावावर उत्तर देणार आहेत. मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत ८ ऑगस्टपासून चर्चा सुरु झाली. काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी चर्चेला सुरुवात करताना विरोधकांचा अजेंडा मणिपूर असेल, असं स्पष्ट केलं होतं. तर काल राहुल गांधी यांनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन भाजपा आणि पंतप्रधानांवर आक्रमकपणे हल्लाबोल केला.
काँग्रेसच्या अविश्वास प्रस्तावाला प्रत्युत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार युक्तिवाद केला. आजही दोन्ही बाजूचे खासदार अविश्वास ठरावावरील चर्चेत सहभागी होणार आहेत. शेवटी, नरेंद्र मोदी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतील. मात्र याआधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती दिली. जग मंदीच्या संकटाचा सामना करत आहे. चीनची अर्थव्यवस्था अडचणीत आहे. जर्मनी, ब्रिटनची अर्थव्यवस्था संकटात आहे. पण आपल्या सरकारने उचललेल्या पावलांमुळे आपली अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
यूपीए सरकारमध्ये आपण गरिबी हटवा असे ऐकायचो. ६ दशकांपासून ऐकत आहोत. पण गरिबी गेली का? असा सवाल उपस्थित करत गरिबी कमी करण्यात आम्ही यशस्वी झालो, असं निर्मला सीतारामन म्हणाले. तसेच गरिबी आणखी कमी करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. यूपीएच्या काळात वीज येईल म्हटलं जायचं आता वीज आलीय, गॅस कनेक्शन मिळेल आता मिळालं आहे. पीएम आवास घर बनेल म्हणायचे आता घर बनलेत. स्वस्त औषधे आणि स्वास्थ सुविधा मिळाल्या आहेत. तोंडी आश्वासने देऊन काँग्रेसनं जनतेला स्वप्न दाखवली पण आम्ही जनतेची स्वप्न साकार करतोय, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी सभागृहात दिली.
दरम्यान, कृषीवर अनेक नेते बोलत होते. २०१४ मध्ये कृषी बजेट २१ हजार कोटी होते आज १ लाखाहून अधिक बजेट झालंय. संरक्षण खात्याला १९४१ कोटी होते आज १६ हजार कोटी बजेट झाले. शेतकऱ्यांना कर्ज मिळणे २०१४ मध्ये कठीण होते. आता सहज शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होते. आज ३ कोटीहून अधिक घरात पाणी पोहचले आहे. देशात नवे जलवाहतूक पर्याय सुरू झाले. ग्लोबल रॅकिंगमध्ये भारत १० व्या क्रमांकावरून आता पाचव्या क्रमांकावर आला आहे, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितले.