नवी दिल्लीः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारनं २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कामधंदे ठप्प असल्यानं अनेकांना पैशांची चणचण भासत आहे. त्यामुळे गृह, वाहन किंवा अन्य हप्ते कसे फेडायचे याचीच चिंता सामान्यांना सतावते आहे. काही दिवसांपूर्वीच निर्मला सीतारामण यांनी दिलासादायक घोषणा केल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच आणखी एक पॅकेज घोषित करणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.
कोरोना व्हायरसनं पूर्ण देशात टाळेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे काही जणांचा पगारही होत नसून अनेक व्यवसाय बंद असल्यानं रोजगार बुडाला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी गरीबांसह उद्योगांसाठी लवकरच आणखी एक आर्थिक पॅकेज जाहीर केले जाईल, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी जागतिक बँकेच्या बैठकीत दिली आहे. तसेच गरजवंत देशांना औषधांचा पुरवठा देखील केला जाईल, असं निर्मला सीतारामन यांनी व्हिडिओ कन्फरन्सिंद्वारे झालेल्या बैठकीत सांगितले.
देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेबरोबर सामान्य लोकांच्या मदतीसाठीही पाऊल उचललेले आहे. मागील महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी १.७० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. सरकारने आतापर्यंत समाजातील विविध वर्गांसाठी सुमारे ३० हजार कोटी रुपयांची मदत केली आहे.